सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी

सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी

अलोक वर्मा (सौजन्य-डेक्कन क्रोनिकल)

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालक पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी नियुक्ती समितीची बैठक निवासस्थानी बोलावली होती. या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना प्रमुख पदावरुन हटवण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती. त्यानंतर आलोक वर्मा यांना सीबीआयच्या प्रमुख पदावर पुन्हा रुजू होण्यास सांगितले होते. बुधवारी त्यांनी पदभारही स्विकारला होता. मात्र आज त्यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.

दोन तासाच्या बैठकीनंतर निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी नियुक्ती समितीची बैठक झाली. आलोक वर्मा यांना नियुक्ती समितीने भ्रष्टाचार आणि कामाची जबाबदारी योग्य पध्दतीने न संभाळल्याचा आरोप करत पदावरुन हटवले आहे. हा निर्णय गुरुवारी सीबीआय संचालकांची नियुक्ती करणाऱ्या नियुक्ती समितीने घेतला आहे. दोन तास झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. नियुक्ती समितीमध्ये तीन सदस्य असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे हे या बैठकिला उपस्थित होते. यामध्ये खरगे यांनी आलोक वर्मा यांच्या गच्छंतीला विरोध केला. मात्र, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये २-१ मतांनी आलोक वर्मा यांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्तब झाला.

एम. नागेश्वर राव संचाकपदी

दरम्यान, सीबीआय अतिरिक्त संचालक एम. नागेश्वर राव हे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत. सीबीआयच्या नव्या संचालकांची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत राव यांच्याकडे या पदाची जबाबदारी राहील अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या रद्द

सीबीआयच्या संचालकपदाचा पदभार पुन्हा एकदा हातात घेतल्यानंतर अलोक वर्मा यांनी निर्णय घ्यायला सुरूवात केली. संचालकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर अलोक वर्मा यांनी नागेश्वर राव यांनी केलेल्या सर्व बदल्या रद्द केल्या आहेत. सीबीआय संचालक अलोक वर्मा यांना सक्तिच्या रजेवर पाठवल्यानंतर नागेश्वर राव यांच्या खांद्यावर हंगामी संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पदभार स्वीकारल्यानंतर नागेश्वर राव यांनी १० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. नागेश्वर राव यांनी केलेल्या बदल्या आता अलोक वर्मा यांनी रद्द केल्या.

हेही वाचा – 

अलोक वर्मांकडून ‘त्या’ बदल्या रद्द

अलोक वर्मांनी घेतला CBI संचालकपदाचा पदभार

First Published on: January 10, 2019 8:47 PM
Exit mobile version