‘आपले नौसैनिक मरण्यासाठी नाहीत’, कोरोनाबाधित जहाजाच्या कॅप्टनचं पत्र!

‘आपले नौसैनिक मरण्यासाठी नाहीत’, कोरोनाबाधित जहाजाच्या कॅप्टनचं पत्र!

कोरोनाच्या डोळ्यांना देखील न दिसणाऱ्या व्हायरसनं आख्ख्या जगाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. मग त्यातून अमेरिकेसारखी जागतिक महासत्ता देखील सुटू शकलेली नाही. किंबहुना अमेरिकेत कोरोनामुळे २ लाखाहून जास्त लोक मरण पावतील असा अंदाज खुद्द अमेरिकन सरकारच सांगत आहे. त्यामुळे त्याची भीषणता अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. गंभीर बाब म्हणजे अमेरिकी लष्करामध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आत्तापर्यंत ६००हून जास्त अमेरिकी जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित झाल्यामुळे गेल्या ८ ते १० दिवसांपासून पॅसिफिक महासागरात गुआम बंदरावर उभ्या असलेल्या अमेरिकी नौदलाच्या थिओडोर रुझवेल्ट या युद्धनौकेच्या कप्तानानं अमेरिकी सरकारला कळकळीची विनंती करणारं पत्र लिहिलं आहे.

‘हे काही युद्ध नाही’

थिओडोर रुझवेल्टवर पहिला कोरोनाग्रस्त नौदल जवान सापडल्यापासून गेल्या ८ ते १० दिवसांपासून ही युद्धनौका पॅसिफिक महासागरातच उभी करून ठेवण्यात आली आहे. त्यावर सुमारे ४ हजार जवान आहेत. यातल्या ८० जवानांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुढचा भीषण प्रकार थांबवण्यासाठी थिओडोर रुझवेल्टच्या कप्तानाने या जवानांना जमिनीवर उतरवून आयसोलेशनमध्ये ठेवलं जावं अशी विनंती केली आहे. या पत्रात कॅप्टन ब्रेट क्रोझियर म्हणतो, ‘सध्या थिओडोर रुझवेल्टवर जवानांना क्वॉरंटाईन आणि आयसोलेशन करण्याची पुरेशी सुविधाच नाही. असंच चालत राहिलं, तर इथला कोरोना कधीही निपटून काढता येणार नाही. त्यामुळ या ४ हजार जवानांना जमिनीवर उतरवून त्यांना योग्य पद्धतीच्या आयसोलेशन किंवा क्वॉरंटाईनमध्ये ठेवलं जावं. त्यांच्यासोबतच नौकेवर मोठ्या संख्येनं क्रू मेंबर्स आहेत, नेव्हल एव्हिओटर्स आहेत आणि इतर कर्मचारी वर्ग आहे. त्यांची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. आपण काही युद्ध लढत नाही आहोत. त्यामुळे हे नौसैनिक कोरोनामुळे मरायला नकोत. जर आपण आत्ताच पावलं उचलली नाहीत, तर आपल्या सर्वात विश्वासार्ह अशा संपत्तीला आपण गमावून बसू. ती संपत्ती म्हणजे आपले नौसैनिक!’

‘ते काही प्रवासी जहाज नाही, युद्धनौका आहे!’

चार पानांच्या या पत्रामध्ये कप्तानानं अमेरिकी सरकारला अक्षरश: आर्जवं केली आहे. नौकेवरच्या सगळ्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या अहवालात कदाचित इथल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र अमेरिकी सरकार अद्याप या नौसैनिकांना खाली उतरवण्याच्या कोणत्याही विचारात नाही. ‘हे काही प्रवासी जहाज नाही. ती युद्धनौका आहे. तिच्याव शस्त्रास्त्र आहेत. क्षेपणास्त्र वाहून नेणारी विमानं आहेत. त्यामुळे आम्हाला योग्य पद्धतीने पावलं उचलावी लागत आहेत’, अशी प्रतिक्रिया अमेरिकी नौदल विभागाकडून देण्यात येत आहे. मात्र, काही जरी असलं, तरी हे अमेरिकी नौसैनिक मरता कामा नयेत, ही त्या कप्तानाची कळकळीची विनंती मात्र, गेल्या १० दिवसांपासून अद्याप ऐकली गेलेली नाही, हे सत्यच आहे!


हेही वाचा – संयुक्त राष्ट्र संघाचा दावा : कोरोना दुसऱ्या महायुद्धानंतरचे मोठे संकट
First Published on: April 2, 2020 8:42 AM
Exit mobile version