अमृसर ट्रेन चालकाने आत्महत्या केल्याची अफवा

अमृसर ट्रेन चालकाने आत्महत्या केल्याची अफवा

प्रातिनिधिक फोटो

दसरा मेळाव्यात ट्रेन रुळावर उभ्या असलेल्या लोकांना रेल्वे दिलेल्या धडकेत ६१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रेल्वे चालकाने आत्महत्या केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. मात्र ट्रेन चालक सुखरुप असल्याचे सांगण्यात आले. चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केलीची बातमी सोशल मीडियावर टाकण्यात आली होती. अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने चालकाकडून लेखी जवाब मागवून घेतला होता. कालच चालकाने रेल्वे प्रशासनाला लेखी जवाब दिला होता.

काय लिहिलाहोता मजकूर

संबधीत स्थानकावरुन हिरवा आणि पिवळा सिग्नल मिळाल्यामुळे रेल्वेला मी पुढे नेले. लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मला दिसली त्यावेळी मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी वेगात असल्याने मला जागेवर थांबवता आली नाही. लोकांची गर्दी मला दिसताच मी हॉर्न वाजवला होता. मात्र लोकांनी गाडीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मी रेल्वे पुढच्या स्थानकावर घेऊन गेलो. या घटनेबद्दल तत्काळ मी रेल्वे अधिकाऱ्यांनाही माहिती दिली होती. असे कुमार याने लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे.

फाटकावरील कर्मचाऱ्यांची चूक

रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, रेल्वे जेव्हा अमृतसरच्या रेल्वे फाटकाजवळ पोहोचली, तेव्हा फाटकावर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्याने नीट लक्ष ठेवायला हवे होते. त्यामुळे या दूर्घटनेत लाइनमनचा दोष असू शकतो. शेकडो नागरिक रुळावर थांबले होते. तरीही त्याने यासंदर्भातील माहिती मोटरमन किंवा त्यांच्या कार्यालयाला दिली नाही. रावण दहनाचा कार्यक्रम सुरू झाला होता. फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्यामुळे लोकांनादेखील ट्रेनचा आवाज आलाच नाही.

आयोजकही दोषी

या दूर्घटनेसंदर्भात रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता, प्रशासनाने सांगितले की, रेल्वे फाटकाशेजारी आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमाबाबत आपल्याला काहीच माहिती देण्यात आली नव्हती. तर दुसरीकडे, पंजाब आणि दिल्लीतील रेल्वे विभागांनी रेल्वे ट्रॅकजवळ रावण दहनाचा कार्यक्रम होत असल्याची आपल्याला कल्पनाही नव्हती असे बोलून हात झटकले आहेत.

First Published on: October 22, 2018 4:28 PM
Exit mobile version