अमेरिकेत बेरोजगारीचा कहर, भारतीयांना गोळ्या घालण्याची धमकी!

अमेरिकेत बेरोजगारीचा कहर, भारतीयांना गोळ्या घालण्याची धमकी!

एकीकडे जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना दुसरीकडे यामुळे उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेली आहे. एकट्या अमेरिकेत आत्तापर्यंत किमान ७ ते ८ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. या वाढत्या बेरोजगारीविरोधात अमेरिकेत तीव्र संताप आणि कमालीचा क्षोभ असून आता त्याची परिणती तिथे नोकरी करणाऱ्या इतर देशातील लोकांवर, विशेषत: भारतीय आणि चीनी नागरिकांविरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात होऊ लागली आहे. नुकताच अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात राहणाऱ्या एका व्यक्तीला अशाच प्रकारचा संताप व्यक्त करणारं एक पत्र मिळालं असून त्यामध्ये थेट ‘भारतीय आणि चीनी नागरिकांना उघडपणे गोळ्या घालू’, अशी धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार टेक्सास पोलिसांनी गांभीर्याने घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या पत्रावर ‘तुमच्या देशात परत जा’ असा मथळा लिहिला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा परदेशातून आपल्या देशात आलेल्या आणि नोकरी करत असलेल्या लोकाबद्दलचा संताप त्यातून व्यक्त होत आहे. ‘अमेरिकेत आयटी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पण इथे भारतीय आणि चीनी लोकं नोकरी करत आहेत. तुम्ही एका क्षणाचाही विलंब न करता आमच्या देशातून चालते व्हा. नाहीतर तुम्हाला निर्दयपणे गोळ्या घालण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही’ असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. टेक्सास प्रांतात मोठ्या संख्येने भारतीय राहतात. मात्र, हे पत्र नक्की कुणाला पाठवण्यात आलं होतं, हे अद्याप समोर येऊ शकलेलं नाही.

अमेरिकेकडून H-1B व्हिसावर निर्बंध

दरम्यान, अमेरिकेतील बेरोजगारीच्या याच परिस्थितीमुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर H-1B व्हिसा (अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक) देण्यावर अमेरिकी सरकारने निर्बंध आणले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी नुकतीच यासंदर्भातली घोषणा केली होती. फक्त अमेरिकेतल्या आरोग्य क्षेत्रात आणि विशेषत: कोरोनाशी संबंधित बाबींमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

First Published on: September 1, 2020 3:47 PM
Exit mobile version