आधार-पॅन लिंकसाठी पुन्हा मुदतवाढ, सीबीडीटीचा करदात्यांना दिलासा

आधार-पॅन लिंकसाठी पुन्हा मुदतवाढ, सीबीडीटीचा करदात्यांना दिलासा

नवी दिल्ली – आधार आणि पॅनकार्ड जोडण्याच्या अंतिम मुदतीला अवघे 3 दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने ही मुदत 3 महिन्यांनी वाढवून करदात्यांना दिलासा दिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार आधार आणि पॅनकार्ड जोडणीची मुदत आता ३० जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी ही मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत होती. 1 जुलैनंतर आधार आणि पॅनकार्ड जोडलेले नसल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल. त्यामुळे नागरिकांना पॅनकार्डशी संबंधित आर्थिक व्यवहार करणे शक्य होणार नाही.

आधार आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारकडून वारंवार आवाहन केले जात आहे. प्राप्तिकर कायदा १९६९ च्या कलम 139 एएनुसार ज्यांच्याकडे आधार आणि पॅनकार्ड असे दोन्ही कार्ड आहेत त्यांनी ते लिंक करणे अनिवार्य आहे. ही दोन्ही कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ होती. त्यानंतर हे दोन्ही कार्ड लिंक करण्यासाठी कार्डधारकांना शुल्क भरावे लागणार होते, परंतु आता सीबीडीटीने दिलासा दिला असून कार्डधारक ३० जून २०२३ पर्यंत लिंक करू शकणार आहेत.

तुमचंही कार्ड लिंक आहे ना?

https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या संकेतस्थळाला भेट द्या. डाव्या बाजूला क्विक लिंक्सच्या भागात लिंक आधार स्टेटसवर क्लिक करा. तिथे दिलेल्या रिकाम्या रकान्यात पॅन नंबर आणि आधार कार्ड नंबर भरा.
तुम्हाला आता एक पॉप-अप संदेश प्राप्त होईल. जर तुमचे दोन्ही कार्ड लिंक झालेले असतील तर तुमचा पॅन आधीच दिलेल्या आधारशी लिंक केलेला आहे, असा संदेश पॉपद्वारे मिळेल. जर लिंक झालेले नसेल तर त्याबाबतही कळवण्यात येते. तुम्हाला दोन्ही कार्ड लिंक करायचे असतील तर लिंक आधारवर क्लिक करा.

लिंक प्रक्रियेत असल्यास करदात्याला त्याच्या विंडोवर दिसेल की तुमची आधार-पॅन लिंकिंग रिक्वेस्ट व्हेरिफिकेशनसाठी यूआयडीएआयकडे पाठवली गेली आहे. थोड्या वेळानंतर पुन्हा लिंक आधार स्टेटसवर जाऊन वरील प्रक्रियेनुसार कार्डचे लिंक स्टेटस तपासा.

जोडणीमागचे कारण काय?

बनावट पॅनकार्डचे प्रमाण कमी करणे आणि कर चुकवेगिरी रोखण्यासाठी सरकारने पॅनकार्ड आणि आधार कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे. केंद्रीय कर मंडळाने २०१७ मध्ये दोन्ही कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून पाचव्यांदा ही मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत ५१ कोटींहून अधिक पॅनकार्ड आधारशी जोडली गेल्याचे सीबीडीटीने म्हटले आहे.

First Published on: March 29, 2023 4:19 AM
Exit mobile version