…म्हणून मलेशियाकडून खाद्यतेल आयात न करण्याचा भारताचा निर्णय!

…म्हणून मलेशियाकडून खाद्यतेल आयात न करण्याचा भारताचा निर्णय!

कलम ३७० रद्द करण्याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतविरोधी भूमिका घेणे मलेशियाच्या अंगलट येणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर भारताच्या भूमिकेला विरोध करत पाकिस्तानचं समर्थन केले. परिणामी मलेशियाकडून कोणत्याही परिस्थितीत खाद्यतेल आयात न करण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे. मलेशियाला अद्दल घडवण्यासाठी ही भूमिका घेण्यात आल्याचे व्यापारी संघटनांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाला मलेशियाने पाकिस्तानची बाजू घेत विरोध केला होता. मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहम्मद यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा कलम ३७० रद्द करण्याचा घेतलेला निर्णय आततायीपणा असल्याची टीका केली होती. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर मलेशियाने पाकिस्तानचे समर्थनच केले होते.

जगात सर्वाधिक पामतेल आणि खाद्यतेलाचे उत्पादन मलेशियामध्ये होते. महत्वाचे म्हणजे भारतच मलेशियाकडून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करतो. भारताने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत दोन अब्ज डॉलरच्या किंमतीत ३.९ मिलियन टन तेल मलेशियाकडून आयात केलं होतं.

भारताला वर्षाला सर्व प्रकारच्या खाद्यतेलाची गरज ही २१० लाख टन एवढी आहे. पैकी जवळपास १५० लाख टन खाद्यतेल भारत आयात करतो. यातही ९५ लाख टन एवढं पामतेल खरेदी करण्यात येतं. यापैकी सर्वाधिक पामतेल भारत मलेशियाकडून आयात करतो. मलेशियाप्रमाणेच इंडोनेशिया आणि थायलंडकडूनही भारत पामतेलाची आयात करतो.

First Published on: October 22, 2019 6:21 PM
Exit mobile version