गुजरात निवडणुकीपूर्वीच अरुण गोयल यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

गुजरात निवडणुकीपूर्वीच अरुण गोयल यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

arun goyal

नवी दिल्ली: माजी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी अरुण गोयल यांनी सोमवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलाय, अशी माहिती निवडणूक आयोगाने (EC) दिली आहे. गोयल हे पंजाब केडरचे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 18 नोव्हेंबरला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते 60 वर्षांचे झाल्यानंतर 31 डिसेंबर 2022 ला निवृत्त होणार होते.

गोयल यांची शनिवारी निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज पदभार स्वीकारलाय. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्यासह ते निवडणूक आयोगाचा भाग असतील. मे 2022 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून सुशील चंद्रांच्या निवृत्तीनंतर निवडणूक आयोगात एक जागा रिक्त होती. त्याच जागेवर आता अरुण गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोयल यांची यापूर्वी अवजड उद्योग खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी सांस्कृतिक मंत्रालयातही काम केले आहे. त्यांची नियुक्ती अशा वेळी झाली आहे, जेव्हा गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या काही महिन्यांत नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार असून, त्यातही नवे निवडणूक आयुक्त महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. राज्यांचं निवडणूक वेळापत्रक ठरवताना निवडणूक आयोगाचे तीनही सदस्य एकत्र असतील.

जाणून घ्या नव्या निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी

>> अरुण गोयल हे अवजड उद्योग सचिव म्हणून कार्यरत होते. याआधी त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातही काम केले होते.
>> अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे पंजाब केडरचे IAS अधिकारी आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी ते 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणार होते, मात्र त्यांनी गेल्या शुक्रवारी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
>> अरुण गोयल यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती गुजरात निवडणुकीच्या काही दिवस आधी झालीय.
>> गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप, विरोधी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात राजकीय चढाओढ आहे.
>> अरुण गोयल हेदेखील मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) होण्यासाठी रांगेत असल्याचे मानले जात आहे.
>> राजीव कुमार यांचा फेब्रुवारी 2025 मध्ये कार्यकाळ पूर्ण होणार आहे.
>> गोयल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांचे वेळापत्रक ठरवण्याचा पूर्ण अधिकार निवडणूक आयोगाकडे असेल.
>> पुढील वर्ष कर्नाटक, तेलंगणा आणि नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा ही ईशान्येकडील राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.


हेही वाचाः अशा माणसाला राज्यपाल पदावर ठेवू नये; भगतसिंग कोश्यारींविरोधात शिंदे गट आक्रमक

First Published on: November 21, 2022 2:19 PM
Exit mobile version