ट्रिपल तलाक कायद्यामुळे मुस्लिम महिला रस्त्यावर येतील – ओवेसी

ट्रिपल तलाक कायद्यामुळे मुस्लिम महिला रस्त्यावर येतील – ओवेसी

तिहेरी तलाक (प्रातिनिधिक छायाचित्र)

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमीन पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्रिपल तलाकच्या नव्या विधेयकावर नाराजी व्यक्त केली आहे. काल लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. ओवेसी म्हणाले की, “या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो. मुस्लिम महिलांना यामुळे रस्त्यावर यायला लागू शकते. या कायद्यामुळे मुस्लिम पतीला तुरुंगात जावे लागेल आणि त्यामुळे मुस्लिम पत्नीचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते.”

काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “भाजपने सादर केलेले विधेयक संविधानाच्या आणि मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवावे अशी मागणी आम्ही केलेली आहे. मात्र लोकसभे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हे विधेयक समंत करुन घ्यायचे आहे.”

काल लोकसभेत ‘मुस्लिम महिला अधिकार संरक्षण (तीन तलाक) विधेयक २०१८’ हे विधेयक
२४५ विरुद्ध ११ मतांनी मंजूर झाले. या नवीन कायद्यानुसार तात्काळ तलाक आणि तलाक-ए-बिद्दत हे तलाकचे प्रकार फौजदारी गुन्हा समजले जाईल. तसेच त्यासाठी तीन वर्षांची कैद आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. काल या विधेयकावर चार तास खडाजंगी झाली. विधेयकावर मतदान घेण्याआधी काँग्रेस, अण्णा द्रमुक आणि इतर विरोधी पक्षांनी सभात्याग करुन आपला निषेध व्यक्त केला. आता हे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवले जाईल. याआधीही तिहेरी तलाकचे विधेयक राज्यसभेत मांडले गेले होते. मात्र विरोधकांचे बहुमत असल्यामुळे तेथे ते फेटाळण्यात आले होते. आता पुन्हा एकदा नव्या तरतुदींसहीत भाजपने नवे विधेयक आणले आहे.

हे वाचा – ऐतिहासिक; तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर!

काँग्रेसने सभात्याग करुन त्यांचे मतपेटीचे राजकारण उघड केले आहे. हे काँग्रेसची ही दुटप्पी भूमिका आधीपासूनच आहे, आता ते राज्यसभेत विधेयकाला अडवून ठेवतील. मात्र त्यामुळे आमचा विश्वास ढळणार नाही, अशी टीका केंद्रीय क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काँग्रेसवर केली.

 

First Published on: December 28, 2018 11:50 AM
Exit mobile version