MP Election: मतदान केंद्रावर ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू

MP Election:  मतदान केंद्रावर ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू

झारखंडसह मध्यप्रदेशमध्ये आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली होती. मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये आज विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरुवात झाली. हे मतदान मध्य प्रदेशात २३० जागांसाठी तर मिझोराममध्ये ४० जागांसाठी सुरु आहे. सकाळपासूनच सगळ्या मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे. मतदारांची गर्दी नियंत्रीत करण्यासाठी मतदान केंद्रांवर अधिकारीदेखील तैनात आहेत. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज मध्यप्रदेशात वेगवेगळ्या विभागातल्या मतदान केंद्रांवरच्या एकूण तीन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. हे तिनही अधिकारी इलेक्शन ड्युटीसाठी मतदान केंद्रावर तैनात होते. त्यापैकी एक अधिकारी गुनातमध्ये तर अन्य दोन अधिकारी इंदौरमध्ये ड्युटीसाठी होते. तिनही अधिकाऱ्यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, इलेक्शन ड्युटी करतेवेळी मृत पावलेल्या या तिनही अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना निवडणूक आयोगाकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

 

मध्य प्रदेशमध्ये ५ कोटी ४ लाख ९५ हजार २५१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये २ कोटी ६३ लाख १ हजार ३०० पुरुष, २ कोटी ४१ लाख ३० हजार ३९० महिला आणि १ हजार ३८९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तर, मिझोराममध्ये एकूण ७ लाख ७० हजार ३९५ नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशात २८९९ तर मिझोराममध्ये २०९ उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. प्रचारसभांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपचे नेते आरोप-प्रत्यारोपांनी कुरघोडी करताना दिसत होते. त्यामुळे आता विजय कुणाचा होईल, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.


वाचा: १०१ वर्षांच्या आजींचा उत्साह; केंद्रावर जाऊन केले मतदान

First Published on: November 28, 2018 2:37 PM
Exit mobile version