म्यानमार सैन्याकडून आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक, लहान मुलांसह 100 जणांचा मृत्यू

म्यानमार सैन्याकडून आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक, लहान मुलांसह 100 जणांचा मृत्यू

म्यानमार सैन्याकडून आपल्याच नागरिकांवर एअर स्ट्राईक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी (11 एप्रिल) केलेल्या या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलं, पत्रकारांसह 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी हे लोक जमले होते. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी एका गावावर प्राणघातक एअर स्ट्राईकची पुष्टी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमार सैन्याच्या फायटर जेटने मंगळवारी सकाळी 8 वाजता 150 लोक जमा झालेल्या ठिकाणी बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास 100 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि 20-30 लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. (At least 100 killed in air strike by Myanmar junta on Pazigyi village vvp96)

एअर स्ट्राईकनंतर एक दीड तासाने एका हेलिकॉप्टरने गोळीबार केला. म्यानमार सरकारने या हल्ल्याचे वार्तांकन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या हल्ल्यात नेमके किती मृत्यू झालेत याचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही.

संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारच्या सैन्याकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकचा निषेध करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी ‘हवाई हल्ल्याचे वृत्त अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. पीडितांमध्ये कार्यक्रमात नाचणारी शाळकरी मुले आणि लष्करी हेलिकॉप्टरने बॉम्बफेक केलेल्या उद्घाटन समारंभाला उपस्थित असलेले इतर नागरिक यांचा समावेश असल्याचे दिसून आले’, असे म्हटले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यात राष्ट्रीय एकता सरकार (NUG) या लष्करी विरोधी गटाचे कार्यालय उद्ध्वस्त झाले. बॉम्बस्फोटाच्या वेळी महिला आणि लहान मुलांसह 150 हून अधिक लोक समारंभात सहभागी झाले होते, असे त्यांनी सांगितले. मृतांमध्ये सशस्त्र गट आणि लष्करी राजवटीला विरोध करणाऱ्या इतर राजकीय संघटनांच्या नेत्यांचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारच्या लष्कराने बंड करून देशाची सत्ता ताब्यात घेतली होती. तेव्हापासून देशात लष्करी राजवटीच्या विरोधात निदर्शने होत आहेत. ही निदर्शने दडपण्यासाठी लष्कर लोकांवर बळाचा वापर करत आहे. लष्कराच्या कारवाईत आतापर्यंत 3,000 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.


हेही वाचा – बापरे! तब्बल 760 कंपन्यांनी केली साडे पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात

First Published on: April 12, 2023 8:51 AM
Exit mobile version