केसीआर यांच्या रॅलीला केजरीवाल, विजयन, अखिलेश यादव यांची उपस्थिती

केसीआर यांच्या रॅलीला केजरीवाल, विजयन, अखिलेश यादव यांची उपस्थिती

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी आज, बुधवारी आपल्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील पहिली रॅली घेऊन बिगर-काँग्रेस विरोधी आघाडी उभारण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. खम्मम शहरात भारत राष्ट्र समितीच्या (BRS) झालेल्या या रॅलीमध्ये आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि केरळचे मुख्यमंत्री व माकपा नेते पिनाराई विजयन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि भाकपा नेते डी. राजा सहभागी झाले होते.

जनता दलचे (एस) नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी देखील केसीआर यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाचे समर्थन केले आहे. कर्नाटकात सुरू असलेल्या आपल्या पंचरत्न रथयात्रेमुळे कुमारस्वामी या रॅलीला उपस्थित राहू शकले नाहीत. भाजपाची (राष्ट्रीय कार्यकारिणी) बैठक काल, मंगळवारी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सांगितले की, 400 दिवस बाकी आहेत. हे सरकार आपले दिवस मोजत आहे. हे 400 दिवसांनंतर हे सरकार राहणार नाही, अशी टीका उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या काही दिवस आधी बीआरएसची रॅली आयोजित करण्यात आली. यासाठी समाजवादी पार्टी आणि माकपासह 21 विरोधी पक्षांना निमंत्रित करण्यात आले. मात्र, केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा निमंत्रित पक्षांच्या यादीत समावेश नव्हता, असे सांगितले जाते. के. चंद्रशेखर राव यांच्या आजच्या (बुधवार) रॅलीत सहभागी झालेले सर्व पक्षांनी काँग्रेसची भारत जोडो यात्रेपासून लांब राहणे पंसत केले. अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसशी असलेले बेबनाव स्पष्ट केला आहे. तथापि, त्रिपुरात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टीने माकपा काँग्रेससोबत जागावाटपाबाबत चर्चा करत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी, 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी बिगर-काँग्रेस, बिगर-भाजपा आघाडीचा मानस जाहीर केला होता. परंतु ते यशस्वी झाले नाही.

के. चंद्रशेखर राव यांच्याव्यतिरिक्त विरोधी पक्षात प्रमुखपदासाठी अनेक दावेदार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी देखील या शर्यतीत आहेत. तिसरी आघाडी होणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे, केसीआर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांची भेट घेतली होती. भारतीय राष्ट्रीय लोकदलाने आयोजित केलेल्या रॅलीत नितीश कुमार म्हणाले होते की, तिसर्‍या आघाडीचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसचा सहभाग असेल अशी आघाडी असली पाहिजे; तरच आपण 2024मध्ये भाजपाचा पराभव करू शकतो.

भाजपा किंवा काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय कोणत्याही तिसऱ्या आघाडीला आतापर्यंत यश मिळालेले नाही. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारला भाजपाचा पाठिंबा होता. तर, चंद्रशेखर, देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालील सरकारांना काँग्रेसचे पाठबळ होते, हे उल्लेखनीय.

First Published on: January 18, 2023 10:22 PM
Exit mobile version