CoronaReturns : न्यूझीलंडचे अच्छे दिन संपले? गायब झालेला कोरोना पुन्हा अवतरला!

CoronaReturns : न्यूझीलंडचे अच्छे दिन संपले? गायब झालेला कोरोना पुन्हा अवतरला!

गेल्या १०२ दिवसांपासून न्यूझीलंड हा देश पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. एप्रिल महिन्यापासून या देशामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे न्यूझीलंडने राबवलेल्या उपाययोजना अवघ्या जगात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडने IPL अर्थात Indian Premier League आपल्या देशात भरवण्याचं देखील आमंत्रण दिलं होतं. मात्र, आता न्यूझीलंडला कोरोनानं पुन्हा धक्का दिला आहे. तीन महिन्यांहून जास्त काळ कोरोनामुक्त राहिल्यानंतर आता न्यूझीलंडमध्ये पुन्हा कोरोना (Corona) अवतरला आहे. त्यामुळे न्यूझीलंड प्रशासनाने पुन्हा काळजीपूर्वक पावलं उचलायला सुरुवात केली असून यासंदर्भात आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आलं आहे. न्यूझीलंडच्या प्रकरणावरून एकदा गेलेला कोरोना पुन्हा कधीही येऊ शकतो, हेच सिद्ध झालं आहे.

ऑकलंडमध्ये सापडले कोरोना रुग्ण!

कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये लॉकडाऊन (Lockdown) काढण्यात आला होता. त्यामुळे तिथलं सामान्य जनजीवन काही महत्त्वाचे नियम पाळून सुरळीत सुरू देखील झालं होतं. मात्र, आता या नव्या कोरोना केसमुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी न्यूझीलंडने १०२ दिवसांनंतर पहिला स्थानिक पातळीवरच संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याचं जाहीर केलं आहे. ऑकलंडमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी ऑकलंडमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सर्व नागरिकांना आपापल्या घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ऑकलंडमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातल्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांना ही लागण नक्की कुठून झाली? याचं उत्तर अद्याप मिळू शकलेलं नसलं, तरी हा संसर्ग स्थानिक पातळीवरच झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. ‘आम्ही सर्वांनी प्रचंड काळजी आणि मेहनत करून कोरोनाला हद्दपार केलं होतं. पण त्यासोबतच, आम्ही या गोष्टीसाठी देखील तयार होतो’, अशी प्रतिक्रिया जेसिंडा ऑर्डर्न यांनी दिली आहे.

First Published on: August 11, 2020 4:31 PM
Exit mobile version