स्वत:चा जीव गमावत त्याने वाचवले दोघांचे प्राण

स्वत:चा जीव गमावत त्याने वाचवले दोघांचे प्राण

दिल्लीमध्ये एका रिक्षाचालकाने स्वत:चा जीव गमावून एका महिलेचे आणि तिच्या दीड वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवले. दक्षिण -पूर्व दिल्लीच्या मीठापूर भागामध्ये ही घटना घडली आहे. २५ वर्षाच्या महिलेचे तिच्या नवऱ्यासोबत भांडण झाले होते. या रागातून महिलेने शनिवारी रात्री आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत आगऱ्याच्या एका कालव्यात उडी मारली. त्याठिकाणावरुन जाणाऱ्या २० वर्षाच्या पवन कुमार या रिक्षाचालकाने कालव्यात उडी मारली आणि दोघांचा जीव वाचवला. मात्र त्यांना वाचवताना त्याने स्वत:चा जीव गमावला. अद्याप रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला नाही. कालव्यामध्ये मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे.

मात्र त्याने स्वत:चा जीव गमावला

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २० वर्षाचा पवन शाह मीठापूर भागामध्ये आपल्या आई-वडील आणि भांवडांसोबत राहत होता. तो ई-रिक्षाचालक होता. शनिवारी रात्री साडेदहा वाजता मीठापूर कालवा पुलावरुन तो जात होता. त्यावेळी त्याने एक महिला आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत कालव्यात उडी मारताना दिसली. पवनने त्यावेळी काहीच विचार न करता महिलेच्या मागे नदीमध्ये उडी मारली. त्याने महिलेला आणि तिच्या मुलाला सुखरुप बाहेर काढले.

आर्थिक मदतीची मागणी

पवनने मदतीची मागणी केली असता त्याठिकाणावरुन जाणाऱ्या तीन तरुणांनी साखळी बनवून त्यांची मदत केली. महिला आणि तिच्या मुलाला त्यांनी सुरक्षितरित्या बाहेर काढले. मात्र त्यावेळी पवन कालव्यात बुडाला. जिल्हा पोलीस उपायुक्त चिन्मय बिश्वास यांनी सांगितले की, तरुणांकडून माहिती मिळताच बचावकार्य करणारे घटनास्थळी दाखल झाले. कालव्यामध्ये पवनचा मृतदेह शोधण्यात आला मात्र तो सापडला नाही. दिल्ली पोलीस हरियाणा प्रशासनाच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेत आहेत. दरम्यान पोलिसांनी सांगितले की, प्रशासनाला पत्र लिहून पवनच्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे.

First Published on: December 27, 2018 12:23 PM
Exit mobile version