Parkash Singh Badal : बादल यांच्या निधनाने माझे वैयक्तिक नुकसान – पंतप्रधान मोदी

Parkash Singh Badal : बादल यांच्या निधनाने माझे वैयक्तिक नुकसान – पंतप्रधान मोदी

Badal's death is my personal loss - PM Modi

नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल (Parkash Singh Badal) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. त्यांचा मुलगा आणि पक्षाध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्या पीएने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाल्याचे सांगितले. ते भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि एक उल्लेखनीय राजकारणी होते. बादल यांच्या निधनाने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे. मी अनेक दशकांपासून त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांच्याकडून खूप काही शिकलो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना शोक
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रकाशसिंग बादल हे राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व होते. ज्यांनी अनेक दशके पंजाबच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आपल्या प्रदीर्घ राजकीय आणि प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी शेतकरी आणि समाजातील इतर दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी अनेक उल्लेखनीय कामे केली. बादल हे आयुष्यभर आपल्या मुळाशी जोडलेले राहिले, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व – नड्डा
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. ते भारतीय राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. पंजाबच्या विकासातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. ते आणि त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शोकसंवेदना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केल्या आहेत.

First Published on: April 25, 2023 11:18 PM
Exit mobile version