रेल्वे पोलीस ठाण्यातील खुंटीवर तीन तास स्फोटकांच्या पिशव्या होत्या लटकत, बिहार पोलीस अनभिज्ञ

रेल्वे पोलीस ठाण्यातील खुंटीवर तीन तास स्फोटकांच्या पिशव्या होत्या लटकत, बिहार पोलीस अनभिज्ञ

पाटणा : ग्वाल्हेरहून बिहारला आलेल्या ग्वाल्हेर एक्स्प्रेसच्या बोगींमध्ये दारू साठा आहे का, याचा तपास करत असताना चार बेवारस पिशव्या आढळल्या. सिवान स्टेशनवर ट्रेनमध्ये दारूसाठा तपासणाऱ्या टीममधील एका कॉन्स्टेबलला या पिशव्या आढळल्यावर त्याने त्या तपासल्या नाहीत. त्याने त्या थेट रेल्वे पोलीस (जीआरपी) ठाण्यात एका खुंटीवर लटकत ठेवल्या. जेव्हा तब्बल तीन तासांनंतर मध्यरात्री पोलीस ठाणेप्रमुखाला या पिशव्यांमध्ये स्फोटके आढळली तेव्हा, त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना याची माहिती दिली. सुदैवाने दरम्यानच्या काळात कोणताही अनुचित घटना घडली नाही.

रेल्वे पोलिसांची (जीआरपी) टीम संध्याकाळी सिवान रेल्वे स्टेशनवर दारूसाठ्याचा शोध घेण्यासाठी तपासणी करत होती. शब्बीर मियाँ नावाच्या कॉन्स्टेबलला ग्वाल्हेरहून आलेल्या ट्रेनच्या एका जनरल बोगीमध्ये चार बेवारस पिशव्या सापडल्या. आतमध्ये काय आहे, हे न तपासताच त्या कॉन्स्टेबलने चारही पिशव्या जीआरपी स्टेशनच्या आत एका खुंटीवर टांगल्या. यानंतर सर्वजण आपापल्या कामात व्यग्र झाले.

सुमारे तीन तासांनंतर सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जीआरपी पोलीस ठाण्याच्या प्रमुखांचे लक्ष त्या पिशव्यांकडे गेले. त्या उघडून पाहताच चारही पिशव्यांमध्ये स्फोटके असल्याचा अंदाज त्यांना आला. काही मिनिटांतच जीआरपी स्टेशन रिकामे करण्यात आले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला. पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी रेल्वेच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना (एडीजी) कळवल्यावर सकाळी 10 वाजता बॉम्बनाशक पथक सिवान स्थानकात दाखल झाले. ते निष्क्रिय केल्यानंतर हे पथक त्या पिशव्या घेऊन निघून गेले. सिवानच्या पुढे गेलेल्या ट्रेनची अन्यत्र तपासणी झाली की नाही, याबाबत अद्यापपर्यंत कोणतेही औपचारिक निवेदन रेल्वेकडून मिळालेले नाही.

नेमकी सामग्री काय होती?
शशी कुमार यांच्या नेतृत्वाखाली सिवानला दाखल झालेल्या बॉम्बनाशक पथकाने जीआरपी कार्यालयाच्या मागच्या पॅसेजमधून एक एक करून बादल्यांमध्ये बॉम्बच्या पिशव्या बाहेर काढल्या. त्याची तपासणी करून, हे साहित्य प्रत्यक्षात काय होते आणि त्याची क्षमता काय होती, हे सांगता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

First Published on: March 23, 2023 12:18 PM
Exit mobile version