बॅट्समन नव्हे बॅटर, MCC ने केलं फलंदाजांचं नामकरण

बॅट्समन नव्हे बॅटर, MCC ने केलं फलंदाजांचं नामकरण

क्रिकेटच्या सामन्यांमध्ये आणि त्याच्या नियमांत कालौघात गरजेप्रमाणे ज्याप्रमाणे बदल होत गेले, त्याचप्रमाणे काही नावांमध्येदेखील बदल झालेत. त्याचप्रमाणे आता फलंदाजांना यापुढे बॅट्समनऐवजी बॅटर किंवा बॅटर्स म्हटलं जाणार आहे. मेरिलेबॉन क्रिकेट क्लब अर्थात MCC ने नियमांत बदल करण्याची मोठी घोषणा आज केली.

कसोटीनंतर एकदिवसीय सामने आले. त्यानंतर त्यात टी २० ची भर पडली. कसोटीही दिवस-रात्र झाली. लाल, पांढऱ्या चेंडूनंतर गुलाबी चेंडूची भर पडली. खेळाडूसाठी डीआरएस सिस्टम आली. क्रिकेट नियमांमध्ये बदल करत फलंदाजाला यापुढे बॅट्समनऐवजी जेंडर न्यूट्रल टर्मनुसार बॅटर किंवा बॅटर्स म्हटलं जाणार आहे. या बदलला MCC ने मान्यता दिली आहे. यापूर्वी क्लबच्या विशेष लॉ सब कमिटीने यावर निर्णय घेतला होता. बॅटर शब्द सर्वसमावेशक असल्यानं भविष्यात हा बदल उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा एमसीसीने व्यक्त केली.

“एमसीसीला वाटतं की जेंडर न्यूट्रल शब्दाचा वापर केल्याने क्रिकेट सर्वसमावेशक होईल. हे पाऊल त्या दिशेनं आहे. यामुळे खेळाप्रती क्रीडारसिकांची भावना आणखी जोडली जाईल.”, असं एमसीसीचे सहाय्यक सचिव एमी कॉक्स यांनी सांगितलं. तर फिल्डर आणि बॉलर या शब्दावर कोणतीच आपत्ती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मान्यतेनंतर lords.org/laws यावर हा बदल प्रकाशित करण्यात आला आहे. काही सरकारी संस्था आणि मीडिया संस्था आधीच वृत्तांकन करताना बॅटर हा शब्द वापरत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने २०१७ मध्ये कायद्यांमध्ये काहीअंशी बदल केले होते. त्यावेळी महिला क्रिकेट फलंदाजांना काय म्हणावं, असा मुद्दा पुढे आला होता. त्यानंतर महिला क्रिकेटमधील प्रमुख व्यक्तींशी चर्चाही झाली होती. तेव्हा बॅट्समन शब्द कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता. मात्र, तरीही त्याबाबत संभ्रम होता. त्यामुळे आता नव्या शब्दाचा वापर करण्याचा निर्णय झाला.

First Published on: September 22, 2021 7:15 PM
Exit mobile version