BBC Gujarat Riots Documentary : सर्वोच्‍च न्‍यायालयात 6 फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी 

BBC Gujarat Riots Documentary : सर्वोच्‍च न्‍यायालयात 6 फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीचा माहितीपटावरून देशभरातील राजकारण तापलं आहे. या बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्‍याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकणी ज्‍येष्‍ठ वकील एम.एल. शर्मा यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 6 फेब्रुवारी रोजी सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. (BBC Gujarat Riots Documentary SC Agrees To List PIL Against The Centre Decision To Ban A BBC Documentary)

21 जानेवारी रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावरील बीबीसीच्‍या माहितीपटावर बंदी घालण्‍याचा आदेश दिला होता. तसेच, या निर्णयावर तत्‍काळ सुनावणी व्‍हावी, अशी मागणीही याचिकाकर्ते एम.एल. शर्मा यांनी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडीपाठासमोर आज (30 जानेवारी 2023) केली. त्यानंतर या याचिकेवर 6 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले.

दरम्यान, एम.एल. शर्मा यांनी दाखल केलेल्‍या याचिकेतून भारतीय राज्‍यघटनेतील कलम 19(1) आणि (2) नुसार 2002 च्या गुजरात दंगल संदर्भातील वस्‍तुनिष्‍ठ माहिती, बातम्या आणि अहवाल पाहण्याचा अधिकार आहे की नाही, याबाबत सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्णय द्‍यावा, अशी मागणी करण्‍यात आली आहे. या माहितीपटातील माहिती वस्‍तूनिष्‍ठ असून, याचा उपयोग पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावाही या याचिकेतून करण्‍यात आला आहे.

गुजरात दंगल आणि अल्पसंख्याकांविरोधातील हिंसाचारावर आधारित बीबीसीच्या माहितीपटावरून देशात मोठा वादंग निर्माण झाला आहे. केंद्रातील मोदी सरकारने बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घातली असून त्या माध्यमातून प्रपोगंडा राबवत असल्याचा आरोप सरकारने केला आहे. या माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, जामिया विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठांसह महाराष्ट्रातील एफटीआय आणि टीसमध्ये उजव्या आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये मोठा वाद झाला. याच वादावर भाष्य करताना सध्या देशात मतभेद निर्माण करून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एनसीसीच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य केले.


हेही वाचा – वरळीतील ‘हा’ माजी नगरसेवक जाणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत; आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

First Published on: January 30, 2023 1:32 PM
Exit mobile version