CoronaEffect: आयपीएल? काही काळ क्रिकेट विसरा आता – सौरव गांगुली!

CoronaEffect: आयपीएल? काही काळ क्रिकेट विसरा आता – सौरव गांगुली!

कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे जगभरात हाहा:कार माजला आहे. या पार्श्वभूमीवर धोका टाळण्यासाठी जगभरातल्या सर्व मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात होणाऱ्या आयपीएल स्पर्धांबाबत चर्चा सुरू झाली होती. भारतात शक्य नसल्यास श्रीलंकेमध्ये आयपीएल खेळवावी असा देखील एक विचार पुढे आला होता. मात्र, या सर्व चर्चांना खुद्द बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने पूर्णविराम लावला आहे. ‘येत्या काही काळात भारतात क्रिकेट होणार नाही’, असं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आयपीएल होण्यासंदर्भातल्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. त्यामुळे या वर्षीचा आयपीएल हंगाम रद्दच झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

जिवापेक्षा खेळ महत्त्वाचा नाही!

जर्मनीमध्ये रिकाम्या स्टॅण्डमध्ये फुटबॉल स्पर्धा भरवण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात देखील आयपीएलसाठी तसाच पर्याय निवडता येईल का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सौरव गांगुलीने ही शक्यता फेटाळून लावली आहे. ‘जर्मनीमध्ये परिस्थिती आणि भारतातली परिस्थिती यात फरक आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात भारतात कोणतंही क्रिकेट होणार नाही. यावर अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाच्याही जिवापेक्षा खेळ महत्त्वाचा नाही’, असं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्याने हे विधान केलं आहे.

दरम्यान, आयपीएल रद्द झाल्यानंतर टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं काय होणार? असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ही स्पर्धा होणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन सरकारने ३१ सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियातील विमानवाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये काय परिस्थिती असेल, त्यानुसार टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात, ‘टी-२० वर्ल्ड कपसंदर्भात आम्ही ऑस्ट्रेलिया सरकार आणि तज्ज्ञांच्या संपर्कात आहोत. या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भातला योग्य तो निर्णय घेतला जाईल’, असं आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

धोनीचं पुनरागमन आता अशक्य?

एकीकडे कोरोनामुळे हे सगळं घडत असताना तिकडे भारताचा माजी कर्णधार, सर्वोत्तम फिनीशर, कॅप्टन कूल असं सगळंकाही असलेल्या महेंद्रसिंह धोनीच्या पुनरागमनावर कायमचा पूर्णविराम लागण्याची शक्यता दाट झाली आहे. आयपीएलमधल्या धोनीच्या कामगिरीवर त्याचा टी-२० वर्ल्डकपमध्ये समावेशाचा निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, आता आयपीएलच जवळपास रद्द झाल्यामुळे धोनीच्या पुनरागमनाच्या आशा आता धूसरच असल्याची चिन्ह आहेत.


Video – ‘या’ क्रिकेटपटूने तयार केलं एम. एस.धोनीवर गाणं, सोशल मीडियावर व्हायरल!
First Published on: April 23, 2020 11:53 AM
Exit mobile version