नुकसान १ लाख कोटींचं, मदत फक्त १ हजार कोटींची; मदत पॅकेजवर ममता बॅनर्जी नाराज

नुकसान १ लाख कोटींचं, मदत फक्त १ हजार कोटींची; मदत पॅकेजवर ममता बॅनर्जी नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फानच्या चक्रीवादळाने नुकसान झालेल्या पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांचा हवाई दौरा केला. पाहणी केल्यानंतर त्यांनी एक हजार कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. त्यांनी केंद्राच्या या मदतीवर नाराजी व्यक्त केली आहे. तोटा एक लाख कोटींचा आणि पॅकेज केवळ एक हजार कोटी असं म्हणत केंद्र सरकारच्या मदतीबद्दल राग व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं आहे. परंतु त्यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. हे पैसे कधी मिळतील किंवा ते आगाऊ पैसे आहेत का? याबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. अम्फानच्या वादळामुळे एक लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. केवळ आमचे ५६ हजार कोटी रुपये केंद्राकडून यायचे आहेत, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

काय म्हणाले पंतप्रधान?

अम्फान चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु आम्ही जवळपास ८० जणांचे प्राण वाचवू शकलो नाही. आम्ही सर्व दु: खी आहोत. ज्या कुटुंबांनी आपले नातेवाईक गमावले आहे, केंद्र आणि राज्य सरकारची त्यांच्याप्रति सहानुभूती आहे, असं हवाई सर्वेक्षणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


हेही वाचा – १ जूनपासून मुंबई, पुण्यातून दररोज विशेष रेल्वे सुटणार; यादी पाहा


पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकांना मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. राज्य सरकारला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून केंद्र सरकार १ हजार कोटी रुपयांची तरतुद करत आहे. तसंच पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.

 

First Published on: May 22, 2020 4:17 PM
Exit mobile version