बाहेर पाऊस आणि बेडरूममध्ये बसलाय वाघ!

बाहेर पाऊस आणि बेडरूममध्ये बसलाय वाघ!

बातमीचं शीर्षक वाचून कदाचित हा काय अजब प्रकार आहे? असं तुम्हाला वाटलं असेल. पण हे घडलंय खरं! हा फोटो आहे आसाममधल्या काझीरंगा अभयारण्यातला एक रॉयल बेंगॉल टायगर चक्क जवळच्याच एका घरातल्या बेडरुममध्ये थेट तिथल्या बेडवर विसावा घेताना आढळून आला आणि सगळ्यांचीच पाचावर धारण बसली! त्यामुळे बाहेर पडलेला पाऊस आणि घरात शिरलेला वाघ अशी विचित्र पंचाईत घरातल्या मंडळींची झाली होती.

काझीरंगा अभयारण्य ९५ टक्के पाण्याखाली!

आसाम आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामधल्या सर्वच भागात दरवर्षी मोठा पाऊस होतो. याच परिसरामध्ये काझीरंगा अभयारण्य देखील आहे. यंदा पडलेल्या पावसामुळे काझीरंगा अभयारण्य तब्बल ९५ टक्के पाण्याखाली गेल्याचं सांगितलं जात आहे. साधारणपणे अशा परिस्थितीत जंगलातले वन्यप्राणी जंगलातच उंच ठिकाणांचा आसरा घेतात असं वनअधिकाऱ्यांचं निरीक्षण आहे. हा वाघ मात्र काझीरंगातून थेट या घरात शिरला आणि त्यानं धाव घेतली बेडरूममधल्या बेडवर!

वाघोबांनी दिवसभर काढली बेडवर झोप!

वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियानं या वाघाचं छायाचित्र ट्विटरवर टाकलं आणि सगळ्यांनाच बेडवर आरामात पडलेल्या वाघोबांचं दर्शन झालं! बेडवर एका कोपऱ्यात शांतपणे हा वाघ जाऊन बसल्याचं या फोटोंमधून दिसत आहे. आता वाघ घरात असताना घरातली मंडली घराबाहेर असणार हे ओघानंच आलं. पण स्थानिकांनी लागलीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं. मात्र, दिवसा उजेडी वाघ बाहेर पडला, तर अधिक गोंधळ माजण्याची शक्यता असल्यामुळे वनअधिकाऱ्यांनी अंधार पडल्यानंतर या वाघाला पुन्हा जंगलात परतण्यासाठी वाट मोकळी करून दिली. अखेर अंधारात बेडवरचा आपला मुक्काम हलवत वाघोबांनी जंगलाची वाट धरली आणि सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.


हेही वाचा – महिला ‘गाईड’ सांगतायत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट
First Published on: July 18, 2019 9:12 PM
Exit mobile version