घरमहाराष्ट्रमहिला 'गाईड' सांगतायत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट

महिला ‘गाईड’ सांगतायत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट

Subscribe

ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात महिला गाईड सांगणार वाघोबाची गोष्ट..

आपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागरांच्या लाटांवर स्वार होतो. या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणं, त्याचा इतिहास समजून घेणंही आपल्याला आवडतं. अशावेळी आपल्या मदतीला येतात ते पर्यटक मार्गदर्शक म्हणजे “गाईड”! पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात महिलांनी कधीच शिरकाव केला असला तरी घनदाट जंगलात पर्यटकांना घेऊन जाणं, त्यांची सुरक्षितता जपतांना त्यांना त्या वनाची, तिथल्या जैव विविधतेची संपूर्ण आणि अचूक माहिती देणं हे जरा हटके काम स्वीकारलं आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील स्थानिक युवतींनी..! या वेगळ्या वाटेवरून जाताना त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग तर चोखाळला आहेच परंतु निसर्ग रक्षणाच्या कामात योगदानही दिले आहे.

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा- अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी ताडोबा-अंधारी, मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसोबत जंगल भ्रमंती करताना या महिला गाईड सांगत आहेत तिथे अधिवास करणाऱ्या वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट, घडवताहेत तिथल्या जैव विविधतेचे दर्शन. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३०, पेंच व्याघ्र प्रकल्पात १२ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५ महिला गाईड कार्यरत आहेत. त्यामुळे तुम्ही जर कधी मेळघाट, पेंच किंवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली आणि महिला “गाईड” तुम्हाला या जंगलाची ओळख करून देतांना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको…

- Advertisement -

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच वनालगतच्या गावांमध्ये स्थानिक महिलांना विविध व्यवसाय- उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे. अचूक आणि परिपूर्ण माहितीने समृद्ध गाईड आलेल्या पर्यटकाला जंगलभ्रमंतीचा उत्तम आनंद देऊ शकतो हे विचारात घेऊन या वन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले गेले आहे.

पर्यटनाला आलेल्या पर्यटकांशी सौजन्याने बोलणे, त्यांना जंगल भ्रमंतीचे नियम समजून सांगणे, जंगलात गेल्यानंतर कसे वागायचे हे शिकवणे, व्याघ्र प्रकल्पाची माहिती देताना वाघांबरोबरच इतर वन्यजीव आणि वृक्षसंपदेने संपन्न असलेल्या वनाची ओळख करून देणे, वन्यजीवांची माहिती देणे, त्या जंगलातील पशू पक्षी आणि प्राण्यांचा असलेला वावर सांगणे यासारख्या गोष्टींमधून पर्यटकाला पर्यटनाचा पुरेपूर आणि भरपूर आनंद मिळेल अशी वर्तणुक करणे यादृष्टीने या महिला पर्यटन मार्गदर्शकांना तयार करण्यात आले आहे. दिल्या जाणाऱ्या माहितीमध्ये एकवाक्यता आणि एकसूत्रता राहील याची काळजी घेतली गेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -