गुजरात : भूपेंद्र पटेल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात लवकरच मोठा बदल करणार

गुजरात : भूपेंद्र पटेल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात लवकरच मोठा बदल करणार

वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण घडामोडींना सुरूवात झालीय. आज भूपेंद्र पटेल यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, पटेल हे लवकरच माजी मुख्यमंत्री रुपानी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार असल्याचे सांगितले जाते आहे.

विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच पक्षाने पटेल यांचे नाव निश्चित केले होते. गांधीनगर येथील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेदेखील उपस्थित होते.

मंत्रिमंडळात करणार फेरबदल

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भूपेंद्र पटेल आता माजी मुख्यमंत्री रुपानी यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यावरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. तर, मंत्रिमंडळातील तीन-चार मंत्र्यांची गच्छंती होऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

असे आले भूपेंद्र पटेल यांचे नाव स्पर्धेत

पटेल हे पाटीदार समाजातून आलेले आहेत. त्यामुळे भाजपने निवडणुकीपूर्वी त्यांना प्राधान्य देत राज्यातील या प्रमुख समाजाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आहे. पटेल राज्यातील मोठ्या पाटीदार नेत्यांपेक्षा कमी लोकप्रिय असले तरीदेखील त्यांच्या निवडीमागील प्रमुख कारण म्हणजे बड्या पटेल नेत्यांमधील वर्चस्वाची गटबाजी असल्याचे सांगितले जाते आहे. याशिवाय पटेल हे माजी मुख्यमंत्री तथा राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय आहेत. ५९ वर्ष वय असलेले पटेल सरदारधामच्या विश्वस्तांपैकी एक आहेत, ज्यांनी पाटीदार समाजाचे आंदोलन उभे केले होते. ते दादा भगवान यांचे अनुयायी आहेत. २०१७ च्या निवडणुकीत पाटीदार आंदोलनामुळे भाजपला मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळेच पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे मानले जाते आहे.

First Published on: September 13, 2021 5:03 PM
Exit mobile version