दिल्ली हिंसाचार : भाजपच्या या नेत्याचं हिंसाचाराशी कनेक्शन?

दिल्ली हिंसाचार : भाजपच्या या नेत्याचं हिंसाचाराशी कनेक्शन?

दिल्ली हिंसाचाराप्रकरणी १०६ जणांना अटक करण्यात आली आहे.

सीएए विरोधक आणि समर्थकांमधील वादामुळे गेले दोन दिवस ईशान्य दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सीएए समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यानंतर हिंसाचाराचा उद्रेक झाला. दोन्ही गटांनी परिसरातील दुकाने, वाहने आणि सार्वजनिक मालमत्तांना लक्ष्य करत जाळपोळ केली. या हिंसाचारात एका पोलिसासह सात जणांचा मृत्यू झाला. गेले अनेक दिवस शांततेत पार पडणाऱ्या आंदोलनाला भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यामुळे हिंसक वळण लागल्याचे आरोप केले जात आहेत. कपिल मिश्रा यांनी केलेली प्रक्षोभक वक्तव्ये आणि सीएए समर्थनार्थ काढलेली रॅली यांचे व्हिडिओ समाज माध्यमांत चांगलेच व्हायरल होत आहेत.

भाजप नेते कपिल मिश्रा यांनी लोकांची डोकी भडकावणारी वक्तव्ये केल्याचा आरोप आपच्या नगरसेवकांनी केला आहे. याप्रकरणी आपच्या नगरसेविका रेशमा नदीम आणि हसीब उल हसन यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

कपिल मिश्रा यांनी लोकांची डोकी भडकावली का?

दिल्लीतील हिंसाचाराला कपिल मिश्रा यांना जबाबदार ठरवण्याचे कारण त्यांनी केलेली विधाने आहेत. सीएए विरोधकांनी शाहीन बागनंतर जाफराबादमध्ये आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ३ वाजून २३ मिनीटांनी “दिल्लीमध्ये दुसरी शाहीन बाग तयार होऊ देणार नाही,” असे ट्वीट केले. त्यांच्या या ट्वीटवर अनेक वातावरण चिघळेल अशा टिपण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कपिल मिश्रा यांनी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर रस्त्यावर उतरून उत्तर देण्याचा इशारा दिला होता.

“दिल्लीमधील हिंसाचार चालूच राहावा म्हणून हे आंदोलन केले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परत जाईपर्यंत आम्ही शांत बसू. दिल्ली पोलिसांना आम्ही तीन दिवसांचा वेळ देतो. जाफराबाद आणि चांदबागचे रस्ते रिकामे करावे. रस्ते रिकामे केले नाही तर आम्हाला समजावू नका. मग आम्ही तुमचेही ऐकणार नाही. फक्त तीन दिवस,” असं कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी २०२० रोजी व्हिडीओसह ट्विट केले आहे.

कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी २०२० रोजी १ वाजून २२ मिनीटांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करणारे ट्वीट केले. “जाफराबाद येथे सुरू असलेल्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी मौजपुरी चौकात CAA समर्थनार्थ रस्त्यावर उतरत आहोत. सगळ्यांनी यावे,” असं त्यांनी म्हटले होते. रविवारी कायद्याच्या समर्थनार्थ भाजप नेते कपिल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली मौजपूर चौकाजवळ लोक जमा झाले होते. त्याचवेळी मौजपूरमधील कबीर नगर मेट्रो स्थानकाजवळ सीएए समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कपिल मिश्रा यांनी २३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनीटांनी एक ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी लोकांना रस्त्यावर येण्याचे आवाहन केले होते. “जाफराबादमध्ये आता व्यासपीठ तयार केले जात आहे. आणखी एका परिसरात भारतातील कायदे चालणे बंद होणार आहे. मोदी बरोबर म्हणाले होते की, शाहीन बाग एक प्रयोग होता. एक एक करून सगळे रस्ते, गल्ल्या, बाजार, कॉलनी गमावण्यासाठी तयार रहा. चुप रहा. जोपर्यंत तुमच्या दरवाज्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत गप्प रहा,” अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.


हेही वाचा – दिल्ली हिंसाचार : कलम १४४ लागू, एक महिना संचारबंदी

 

First Published on: February 25, 2020 5:54 PM
Exit mobile version