‘शाहीन बाग हा आंतरराष्ट्रीय कट’, भाजप आमदाराची मुक्ताफळं!

‘शाहीन बाग हा आंतरराष्ट्रीय कट’, भाजप आमदाराची मुक्ताफळं!

सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक, एनआरसी आणि एनपीआर याविरोधात दिल्लीच्या शाहीन बागेत आणि देशातल्या इतर अनेक ठिकाणी गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या संख्येने आंदोलक विरोध करत आहेत. मात्र, या आंदोलनाला अनेकांनी विरोध देखील केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भाजप पक्ष आणि पक्षाशी संबंधित संघटनांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अनेक नेत्यांकडून या आंदोलकांसंदर्भात वादग्रस्त विधानं देखील केली जात आहेत. त्यातच आता आणखीन एका भाजप नेत्याचा समावेश झाला आहे. भाजपचे उत्तर प्रदेशमधील आमदार सुरेंद्र सिंह यांनी दिल्लीतील शाहीन बागेत आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर टीका केली आहे. ‘शाहीन बागमध्ये सीएएच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला जागतिक स्तरावरील मुस्लीम देशांकडून आर्थिक पाठवबळ आहे’, असं सुरेंद्र सिंह म्हणाले आहेत.

‘हा देशात फूट पाडण्याचा प्रयत्न’

‘शाहीन बागमधल्या आंदोलकांना इतर मुस्लीम देशांकडून आर्थिक पाठबळ मिळत असून मुस्लीम देशांचं हे कट-कारस्थान आहे. देशात फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे’, असं सिंह म्हणाले आहेत. याशिवाय, त्यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर देखील टीका केली आहे. ‘ओवैसींच्या खऱ्या भावना या भारतविरोधी आहेत. खरंतर ओवैसी हे भारताचे शत्रू आहेत. ते भारतात राहात असले, तरी त्यांच्या भावना या पाकिस्तान धार्जिण्या आहेत’, असं देखील सुरेंद्र सिंह म्हणाले आहेत.

भाजपच्या नेत्यांची आक्षेपार्ह विधानं

याआधीदेखील अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी शाहीन बागेतील आंदोलनकर्त्यांविषयी आक्षेपार्ह विधानं केली होती. ‘हे आंदोलन हा एक मोठा कट आहे’, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, तर ‘ईव्हीएम मशीनवरचं बटण इतक्या जोरात दाबा की त्याचा करंट थेट शाहीन बागेपर्यंत जायला हवा’, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. ‘देश के गद्दारो को, गोली मारो सालों को’ असं विधान भाजपचे आमदार अनुराग ठाकूर यांनी केलं होतं. तर ‘बोली से नहीं मानेंगे, तो गोली से मानेंगे’, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले होते. याशिवाय, भाजपचे नेते परवेज शर्मा यांनी तर ‘शाहीन बागेतील आंदोलक तुमच्या घरात घुसून बलात्कार करतील’, असं विधान केलं होतं.


हेही वाचा – अखेर अमित शहांनी दिली जाहीर कबुली.. ‘असं करायला नको होतं’!
First Published on: February 22, 2020 9:11 PM
Exit mobile version