मध्यप्रदेशात तरूणानं भाजप आमदाराच्या कानाखाली लगावली

मध्यप्रदेशात तरूणानं भाजप आमदाराच्या कानाखाली लगावली

फोटो सौजन्य - पंजाब केसरी

आत्तापर्यंत आमदाराकडून तरूणाला मारहाण झाल्याच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत. पण, तरूणानं आमदाराला मारहाण केली असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुम्ही विश्वास ठेवाल? पण, अशी घटना घडली आहे मध्यप्रदेशातील मंदसौर विधानसभा मतदारसंघात. विधानसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या असल्यानं आता प्रचाराचा देखील जोर वाढत आहे. राज्यात भाजप मागील १५ वर्षापासून सत्तेत आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोकप्रतिनिधींना विरोधाचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी आता वाद देखील होताना दिसत आहेत. या वादावादी दरम्यान एका तरूणानं भाजप आमदाराच्या कानशीलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे.

मंदसौर मतदारसंघातून यशपाल सिंह सिसोदिया यांना भाजपनं तिकीट दिली आहे. यापूर्वी यशपाल सिंह सिसोदिया दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. सिसोदिया सध्या प्रचार करत असून त्यांना काही ठिकाणी लोकांच्या विरोधाचा देखील सामना करावा लागत आहे. यावेळी झालेल्या बाचाबाची दरम्यान एका तरूणानं यशपाल सिंह सिसोदिया यांच्या कानशीलात लगावली. प्रचारादरम्यान झालेल्या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, कानाखाली लगावणाऱ्या तरूणाचे मानसिक संतुलन बिघाडले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती तरूणाच्या वडिलांनी दिली आहे. मानसिक संतुलन बिघडलेले असल्यानं तरूणावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यापूर्वी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांच्या पत्नी साधना सिंह तसेच मंत्री दीपक जोशी यांना देखील विरोधाचा सामना करावा लागला होता.

एकंदरीत राज्यातील राजकीय वातावरण पाहता चौथ्यांदा भाजप सत्तेवर येणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण, त्यासाठी आता वाट पाहावी लागणार आहे ती निकालाची.

First Published on: November 14, 2018 4:11 PM
Exit mobile version