राम कदमांनंतर मध्य प्रदेशातल्या भाजप खासदाराचं धक्कादायक विधान!

राम कदमांनंतर मध्य प्रदेशातल्या भाजप खासदाराचं धक्कादायक विधान!

मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री कुंवर कुमार शाह

शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मध्य प्रदेशमध्येही विविध ठिकाणी अशा प्रकारचे शिक्षकांना सन्मानित करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये मध्य प्रदेश सरकारमधील विविध मान्यवर मंत्री, आमदार, खासदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. अशाच एका कार्यक्रमामध्ये भाजपचे खासदार आणि मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री कुंवर विजय शाह यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शिक्षकांचा सन्मान करणारं भाषण त्यांनी देणं अपेक्षित होतं. त्यांनी तसं भाषण तर केलं, पण त्याच वेळी अशी चूक केली ज्यामुळे सोशल मीडियावर ते ट्रोल होऊ लागले. त्यामुळे एकीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह बेताल वक्तव्यामुळे ते टीकेच्या केंद्रस्थानी असताना आता भाजपचा आणखी एक नेता टार्गेट होऊ लागला आहे.

नेमकं काय म्हणाले कुंवर शाह?

मी बघतोय आत्ता आपले काही सहकारी टाळ्या वाजवत नाही आहेत. पण गुरू हा इश्वरापेक्षाही मोठा असतो. त्यामुळे जे आत्ता गुरुच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या नाहीत, तर पुढच्या जन्मी त्यांना घरोघरी जाऊन टाळ्या वाजवत बसावं लागेल.

कुंवर विजय शाह यांना बुधवारी शिक्षक दिनानिमित्ताने एका राज्य स्तरीय शिक्षक सन्मान कार्यक्रमामध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी सुमारे ५० शिक्षकांचा सन्मान देखील केला. मात्र, त्याचवेळी उपस्थित शिक्षकांना संबोधित करताना त्यांन हे वादग्रस्त विधान केलं. ‘जो शिक्षकांच्या सन्मानासाठी टाळ्या वाजवत नाही, त्याला पुढच्या जन्मी घरोघरी जाऊन टाळ्या वाजवत बसावं लागेल’ असं धक्कादायक विधान त्यांनी केल्यामुळे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कुंवर शाह यांनी तृतीयपंथीयांचा अपमान केल्याची भावना व्यक्त होत आहे.

कायमच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत

कुंवर विजय शाह यांच्या या विधानामुळे सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असली, तरी ते वादात अडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या विधानावरून किंवा निर्णयांवरून ते वादात अडकले होते. याआधी सप्टेंबर २०१७मध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांची हजेरी घेताना ‘यस सर’ किंवा ‘यस मॅडम’ऐवजी ‘जय हिंद’ म्हणण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला होता. एकदा एका शाळेमध्ये त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले असता ‘कष्टाची किंमत कळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नोकरासारखी कामं करायलाच हवीत’ अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं.

First Published on: September 5, 2018 5:09 PM
Exit mobile version