घरमुंबईबेताल वक्तव्य राम कदमांना भोवणार? पक्षाने मागवला खुलासा!

बेताल वक्तव्य राम कदमांना भोवणार? पक्षाने मागवला खुलासा!

Subscribe

भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे राम कदम यांनी ट्वीट करून खेद व्यक्त केला आहे. मात्र, त्यांनी माफी मागावी अशी मागणी आता होत आहे. दरम्यान, प्रदेश भाजपने यासंदर्भात राम कदम यांच्याकडून खुलासा मागवला असून त्यांच्या त्या वादग्रस्त भाषणाची संपूर्ण सीडी देखील मागवून घेतली आहे.

दहीहंडीदरम्यान भाजपचे घाटकोपरमधील आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केल्यानंतर आता त्यांना उपरती झाली आहे. आपण चुकीचे वक्तव्य केल्याचा साक्षात्कार त्यांना झाला असून याबाबत त्यांनी ‘ट्विटर’वर ‘दिलगिरी’ व्यक्त केली आहे. पण ही दिलगिरी व्यक्त करतानाही त्यांनी माफी न मागता फक्त ‘खेद’ व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधातली नाराजी अजूनच वाढत असून विरोधकांच्या हाती आयतंच कोलीत मिळालं आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या विरोधकांना भाजपच्या नेत्यांच्या वृत्तीवर आक्षेप घेण्याची आता वेळ आली आहे.

…तर मुलीला पळवून आणू!

घाटकोपरमध्ये राम कदम यांचा दरवर्षी मोठा दहीहंडी उत्सव होतो. याहीवर्षी त्यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या उत्सवाला मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबतच मुख्यमंत्री आणि इतर दिग्गज राजकारण्यांनीही हजेरी लावली होती. याच उत्सवात जमावासमोर बोलताना राम कदम यांची जीभ घसरली आणि उत्साहाच्या भरात ते नको ते बोलून गेले. उपस्थित तरुणांना उद्देशून राम कदम यांनी, ‘जर तुम्हाला एखादी मुलगी आवडली आणि तुमच्या आई-वडिलांची देखील पसंती असेल तर ती नाही म्हणत असतानाही मुलीला पळवून आणू‘ अशा आशयाचं विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी खरपूस टीका करायला सुरुवात केली.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – ‘पप्पू पुन्हा नापास झाला’; मनसेने उडवली राम कदमांची खिल्ली


…तर खेद व्यक्त करतो

दरम्यान विरोधकांसोबतच सामान्य जनतेकडूनही राम कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली जात असताना राम कदम यांनी मात्र जाहीर माफी न मागता फक्त ‘खेद’ व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. शिवाय विरोधकांनी अर्धवट भाषण पसरवून संभ्रम निर्माण केला असा दावादेखील त्यांनी या ट्वीटमध्ये केला आहे.

- Advertisement -

प्रदेश भाजपने मागवला खुलासा

दरम्यान, या बेताल वक्तव्याबाबत प्रदेश भाजपने आमदार राम कदम यांच्याकडे खुलासा मागवला आहे. तसेच, त्यांच्या वक्तव्याची पूर्ण सीडी देखील मागवली आहे. मात्र, आता राम कदम यांच्यावर भाजपकडून काय कारवाई केली जाते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा – भाजप आमदार राम कदम यांची ‘मोटार सायकल भेट’ वादात!


सोशल मीडियावर ट्रोल

राम कदम यांनी जरी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर खेद व्यक्त केला असला, तरी त्यामुळे नेटिझन्सचं मात्र समाधान झालेलं नाही. त्यांच्या खेदाच्या ट्वीटवर ट्विटकरींनी जोरदार ट्रोलिंग सुरू केलं आहे.

राम कदम यांचं विधान कोणत्या हेतूने आलं याचा यथावकाश मागोवा घेतला जाईलच, पण तूर्तास तरी ‘अशा भाजप नेत्यांच्या नेतृत्वात महिला सुरक्षित कशा राहतील?’ हा प्रश्न मात्र उपस्थित होऊ लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -