अल्पसंख्याकांसाठी भाजप काढणार बाईक रॅली

अल्पसंख्याकांसाठी भाजप काढणार बाईक रॅली

नवी दिल्लीः पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याअंर्गतच मुस्लिम, ख्रिचन, पारसी, जैन, बौद्ध समाजातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने मास्टर प्लान तयार केला आहे. अल्पसंख्यांक मतदार अधिक असलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजप बाईक रॅलीचे आयोजन करणार आहे. दिल्ली येथे होणाऱ्या अल्पसंख्याक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अल्पसंख्याक अधिक मतदार असलेल्या लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या बाईक रॅलीत मुस्लिम धर्मगुरुंना सहभागी करून घेण्याचे नियोजन भाजपने केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील पाच हजार मुस्लिम व अन्य अल्पसंख्याक मतदारांना पक्षासोबत जोडण्याचा भाजपचा मानस आहे. मुस्लिम धर्म गुरुंना बाईक रॅलीत सहभागी करुन केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप करणार आहे. लोकसभा मतदारसंघात भाजप अल्पसंख्याकासाठी स्नेह संमेलन आयोजित करणार आहे.

भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच अल्पसंख्याक मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ६० ते ७० मतदारसंघ असे आहेत जेथे अल्पसंख्याक मतदार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या मतदारसंघातील सुफी, सुशिक्षित मुस्लिम, डॉक्टर, इंजिनिअर, शिल्पकार, छोटे व्यावसायिक यांना पक्षासोबत जोडण्याचे काम भाजप करणार आहे.

लोकसभा मतदारसंघातील अल्पसंख्याकांची माहिती घेण्यासाठी भाजप बुथ व्हेरिफिकेशन सुरु करणार आहे. येत्या एप्रिल व मे महिन्यात दिल्ली येथे भाजप भव्य असे अल्पसंख्याकांचे संमेलन घेणार आहे. तीन लाख अल्पसंख्याक यात सहभागी होतील, असे भाजपचे नियोजन सुरु आहे.

भाजपने लक्ष केंद्रीत केलेल्या ६० जागांपैकी भाजपने उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 13 जागा आहेत. जम्मू-काश्मीरमधून 5, बिहारमधून 4, केरळ आणि आसाममधून 6-6, मध्य प्रदेशमधून 3, तेलंगणा आणि हरियाणामधून 2-2 आणि महाराष्ट्र आणि लक्षद्वीपमधून 1-1 जागा आहेत. भाजपच्या यादीतील पश्चिम बंगाल मतदारसंघांमध्ये बेहरामपूर (64 टक्के अल्पसंख्याक लोकसंख्या), जंगीपूर (60 टक्के), मुर्शिदाबाद (59 टक्के) आणि जयनगर (30 टक्के) यांचा समावेश आहे. येथे अल्पसंख्याकासाठी भाजप विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

First Published on: January 25, 2023 4:23 PM
Exit mobile version