‘कोरोना पसरविण्यात तबलिगींचा हात नाही, त्यांना बळीचा बकरा बनवलं’

‘कोरोना पसरविण्यात तबलिगींचा हात नाही, त्यांना बळीचा बकरा बनवलं’

तबलिगी जमात

कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढायला सुरुवात झाल्यानंतर मार्च महिन्यात दिल्ली येथे झालेल्या तबलिगी मरकजमुळे आणखी दहशत पसरली होती. तबलिगींमुळे भारतात कोरोना पसरला असा एक आरोप करण्यात आला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay Hight Court) औरंगाबाद खंडपीठाने ही शक्यता फेटाळून लावत याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले आहे. तबलिगी मरकजमध्ये सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांमुळे कोरोना पसरला नसून त्यांना बळीचा बकरा (Scapegoat) बनविण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती टी.वी. नलावडे आणि न्यायमूर्ती एम.जी. शेवळीकर यांच्या खंडपीठाने २९ परदेशी नागरिकांविरुद्धचे एफआयआर रद्द करताना हे निरीक्षण नोंदविले.

या प्रकरणावर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सांगितले की, “मरकज सारखे कार्यक्रम गेल्या ५० वर्षांपासून सुरु आहेत. या कार्यक्रमाविरोधात जो प्रचार करण्यात आला तो चुकीचा आहे. देशात वेगाने पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या आकड्यांवर नजर टाकली तर या लोकांविरोधात केलेली कारवाई अयोग्य वाटते. हे नुकसान भरून काढण्यासाठी आता सकारात्मक पावले उचलावीत”, असे निर्देश न्यायालयाने दिले.

First Published on: August 22, 2020 8:42 PM
Exit mobile version