स्तनांचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग

स्तनांचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग

प्रातिनिधिक फोटो

भारतीय महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाविषयी किती जागरूकता आहे, हे जाणून घेण्याच्या उद्दिष्टाने फ्युचर जनराली इंडिया लाइफ इन्श्युरन्स कंपनीकडून करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. स्तनांचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे. किंबहुना महिला कर्करुग्णांपैकी २५% प्रमाण स्तनांच्या कर्करोगाचे आहे. ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मन्थच्या (बीसीएएम) निमित्ताने एफजीआयएलआय या इन्श्युरन्स कंपनी आणि मॉम्स्प्रेसो यांच्या संयुक्त विद्यमाने हे सर्वेक्षण करण्यात आले. स्तनांच्या कर्करोगाबाबत चर्चा घडविणे आणि त्याच्या लक्षणांविषयी जागृती निर्माण करणे, हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते. स्तनांमध्ये गाठ येणे किंवा स्तन जाडसर होणे यासारख्या सामान्यपणे आढळणाऱ्या लक्षणांबाबत महिलांना सजग करणे आणि वेळेवर निदान किंवा उपचार केल्यास त्याच्या होणाऱ्या सकारात्मक परिणामांविषयी माहिती देणे महत्त्वाचे आहे. देशातील १० महानगरांमधील २२२५ महिलांना या सर्वेक्षणाअंतर्गत विचारणा करण्यात आली.

स्तनांच्या कर्करोगाबाबत मोठ्या प्रमाणावर जागृती

भारतात स्तनांचा कर्करोग दुर्मीळ नाही. ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस सर्व्हेनुसार सुमारे ८६% महिलांना या विषयी माहिती आहे. देशात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण किती आहे, हे माहीत असल्याचे ६०% महिलांनी सांगितले. किंबहुना, आपल्याला स्तनांचा कर्करोग होऊ शकतो, अशी भीती ५०% महिलांना वाटते. हे सर्वेक्षण दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, भोपाळ आणि चंदीगड यासारख्या मोठ्या शहरांमध्ये करण्यात आले.

स्तनांच्या तपासणीकडे करण्यात येणारे दुर्लक्ष

ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस सर्व्हेच्या निष्कर्षांनुसार बहुतांश महिलांना तपासणीची आवश्यकता वाटत नव्हती, तर स्तनांच्या कर्करोगाबाबत तपासणी करून घेता येऊ शकते, हेही अनेकींना माहीत नव्हते. त्याचप्रमाणे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी सांगितले की, या रोगासाठी तपासणी करून घेण्यासाठी त्या आळस करतात किंवा त्यांचे वय लक्षात घेता त्यांना ही चाचणी करण्याची आवश्यकता वाटत नाही. स्तनांच्या कर्करोगासाठी नियमित तपासणी करून घेतली पाहिजे, हे सर्वेक्षणात सहभागी ८०% महिलांना माहीत आहे. असे असले तरी केवळ २५% महिलांनी ही तपासणी करून घेतली आहे. दुर्लक्ष किंवा आळस या कारणांमुळे सुमारे ७५% सहभागींनी ही तपासणी करून घेतली नाही.

स्तनांच्या कर्करोगाबाबत माहिती नसणे

कोणत्या वयात स्तनांच्या कर्करोगाची तपासणी करून घेण्यास सुरुवात केली पाहिजे, याची निम्म्याहून अधिक महिलांना माहिती नव्हती. स्तनांच्या कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी करण्याच्या स्वयंतपासणीबाबत दोन तृतियांश महिलांना माहिती नव्हती. ६५% महिलांना मॅमोग्राफी या स्तनांच्या कर्करोगाच्या तपासणीबाबत माहिती नव्हती. तब्बल ८०% महिलांना स्तनांच्या वैद्यकीय तपासणीबाबत माहिती नव्हती.

महिलांना स्तनांच्या कर्करोगाबाबत चर्चा करताना अवघडल्यासारखे वाटते

स्तनांच्या कर्करोगाविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी सजगता नसण्यासाठीची कारणेही या सर्वेक्षणातून दिसून आली. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी ६०% महिलांना स्तनांच्या कर्करोगाविषयी त्यांच्या मित्रमैत्रिणींशी वा कुटुंबियांशी चर्चा करताना अवघडल्यासारखे वाटते.

कर्करोगासाठी असलेल्या उपचारांबाबत पुरेशी माहिती नसणे

सर्वेक्षणात असेही दिसून आले की, ७०% सहभागींना कर्करोगावरील विविध प्रकाराच्या उपचारांविषयी माहिती नव्हती. किंबहुना, त्यांना केवळ केमोथेरपी ही एकच उपचारपद्धती माहीत होती. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी १२% सहभागींना स्तनांचा कर्करोग होता किंवा यापूर्वी होऊन गेला होता. स्तनांच्या कर्करोगाशी लढा देणाऱ्यांपैकी बहुतेकींना स्तनांमध्ये वेदना किंवा अस्वस्थता जाणवत होती, स्तनांच्या आकारात बदल झाला होता किंवा गाठ आली होती.

उपचारांसाठी आर्थिक दृष्ट्या सज्ज राहण्याची गरज

स्तनांच्या कर्करोगाशी संबंधित उपचारांच्या खर्चाबाबत किती भारतीय महिलांना माहिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न फ्युचर जनराली लाईफ इन्श्युरन्स आणि मॉम्प्रेसो यांनी केला. या रोगाच्या उपचारांचा खर्च २.५ लाख ते २० लाखांच्या घरात असतो. पण सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ५०% महिलांना हा खर्च २ लाखांच्या आत असेल असे वाटत होते. उपचारांचा खर्च इतका कमी असल्याचे वाटत असल्यामुळे ७२% महिलांना स्तनांच्या कर्करोगासाठी असलेल्या विमा योजनांविषयी त्यांना माहीत नव्हते, यात नवलाची बाब नव्हती.


हेही वाचा – अर्धवट झोप आरोग्यासाठी घातक…

First Published on: October 25, 2018 10:05 PM
Exit mobile version