ब्रिटिश सरकारची खेळी, म्हणे कोहिनूर आमच्या ‘विजयाचं प्रतीक’

ब्रिटिश सरकारची खेळी, म्हणे कोहिनूर आमच्या ‘विजयाचं प्रतीक’

भारताला ब्रिटीशांच्या जुलुमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळून आता ७० वर्ष झाली. तरीही ब्रिटिशांनी दिलेल्या काही जखमा अजूनही ताज्या आहेत. ब्रिटिशांनी आपल्या देशातला अनमोल वैभव कोहिनूर हिरा लुटला तो आजवर दिलाच नाही. कोहिनूर हिरा हा भारताचा असूनही त्याला मिळवण्यासाठीचा लढा सुरूच आहे. तरीही ब्रिटीश काही भारताचा हक्क मान्य करत नाहीत. उलट भारताचा हा कोहिनूर हिरा ब्रिटीश लोक आता ‘विजयाचं प्रतिक’ म्हणून मिरवणार आहेत.

ब्रिटनमध्ये कोहिनूर हिरा टॉवर ऑफ लंडनमध्ये ‘विजयाचे प्रतीक’ म्हणून प्रदर्शित केला जाईल. येत्या २६ मे पासून हे प्रदर्शन लोकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. या हीऱ्याला टॉवर ऑफ लंडनमध्ये डिस्प्ले केला जाणार आहे. ब्रिटिश राजघराण्याचे उर्वरित क्राउन ज्वेल्ससह कोहिनूरचा देखील यात समावेश केला जाणार आहे.

ब्रिटेनच्या महलांमध्ये काम करणाऱ्या चॅरिटी हिस्टोरिक रॉयल पॅलेसेज (एचआरपी) चे म्हणणे आहे की न्यू ज्वेल हाउस एग्जिबिशन कोहिनूरच्या इतिहासाविषयी सांगणार आहे. कोहिनूर हीरा ब्रिटेन ची दिवंगत क्वीन एलिजाबेथची आईच्या ताजमध्ये लावलाय आणि या ताजला टॉवर ऑफ लंडनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

कोहिनूरचा संपूर्ण प्रवास एकापेक्षा जास्त प्रॉप्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. मुघल सम्राट, इराणचे शाह, अफगाणिस्तानचे शासक आणि शीख महाराजा यांसारख्या पूर्वीच्या सर्व मालकांसाठी ते विजयाचे प्रतीक कसे होते हे देखील सांगण्यात येणार आहे.

किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकानंतर भरवण्यात येणार हे प्रदर्शन
टॉवर ऑफ लंडनचे गव्हर्नर अँड्र्यू जॅक्सन म्हणाले की, हे वर्ष आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. ब्रिटनचे नवे किंग चार्ल्स यांचा ६ मे रोजी राज्याभिषेक होणार आहे. टॉवर ऑफ लंडन देखील यात आपली भूमिका बजावणार आहे. राज्याभिषेकानंतर लगेचच अनेक मौल्यवान दागिने प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. या संग्रहाबद्दल लोकांना माहिती देणे हा आमचा उद्देश आहे.

कॅमिला कोहिनूर असलेला मुकुट घालणार नाही
यापूर्वी ब्रिटनची नवीन राणी म्हणजेच किंग चार्ल्स-III ची पत्नी कॅमिला यांनी राज्याभिषेकादरम्यान राणी एलिझाबेथचा कोहिनूर असलेला मुकुट न घालण्याची घोषणा केली होती. राजघराण्याला भारतासोबतचे संबंध बिघडण्याची भीती होती, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर कॅमिलासाठी क्वीन मेरीचा १०० वर्षांचा मुकुट तयार करण्याची चर्चा होती.

भारताने अनेकवेळा कोहिनूर परत मागितला
राणीचा मुकुट कोहिनूर आणि आफ्रिकेतील ग्रेट स्टारसह जगातील अनेक मौल्यवान हिरे आणि दागिन्यांनी जडलेला आहे. त्याची किंमत सुमारे $४०० लाख एवढी आहे. भारताने ब्रिटनसमोर अनेकवेळा कोहिनूर हिऱ्यावर आपला कायदेशीर हक्क सांगितला आहे. भारताप्रमाणेच आफ्रिकेनेही ब्रिटनच्या शाही मुकुटात जडलेले आपले मौल्यवान हिरे परत करण्याची मागणी अनेकदा केली आहे.

अनेक देशांनी कोहिनूरवर केलाय दावा
कोहिनूर हिऱ्याचा इतिहास वादांनी भरलेला आहे. १८४९ मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी पंजाबवर ताबा मिळवला तेव्हा हा हिरा ब्रिटनच्या तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या हवाली करण्यात आला होता. नंतर ते इतर अनेक हिऱ्यांसह ब्रिटीश मुकुटात ठेवण्यात आले. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इराणनेही या हिऱ्यावर दावा केला आहे.

First Published on: March 17, 2023 5:20 PM
Exit mobile version