Lok Sabha Election 2024 : मंगळसूत्रावर गंडांतर यांच्यामुळेच; उद्धव गटाची पंतप्रधान मोदींवर टीका

Lok Sabha Election 2024 : मंगळसूत्रावर गंडांतर यांच्यामुळेच; उद्धव गटाची पंतप्रधान मोदींवर टीका

मुंबई : काँग्रेसच्या राजवटीत तुमचे मंगळसूत्र सुरक्षित नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीगढ येथील सभेत केला. माता-भगिनींच्या सोन्याचे मोजमाप करणार असल्याचे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. यावरूनच आता राजकीय वाद पेटला आहे. उद्धव गटाने ‘सामना’ अग्रलेखातून निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या राजवटीत महागाई एवढी वाढली की, माता – भगिनींना आपापली मंगळसूत्रे विकावी लागल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024 : Shivsena – UBT slams PM Modi and BJP statement on mangalsutra and congress menifesto)

मंगळसूत्राचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला?

पंतप्रधान जाहीर सभांतून महिलांची मंगळसूत्रे खेचण्याची भाषा करून आग लावत आहेत. हिंदू संस्कृतीत मंगळसूत्र पवित्र मानले जाते. त्या मंगळसूत्रालाच राजकारणात खेचण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. हिंदुत्वास आणि हिंदू संस्कृतीस हे मान्य नाही. हिंदू महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांचा असा अपमान करण्याचा अधिकार मोदी यांना कोणी दिला? मोदी यांनी मंगळसूत्राची प्रतिष्ठा स्वतःच्याच घरात ठेवली नाही असे बोलले जाते. मोदी यांच्या काळातच मंगळसूत्रांवर सगळ्यात मोठे गंडांतर आले. नोटाबंदीच्या काळात अनेक हिंदू महिलांना मंगळसूत्र विकून घर चालवावे लागले. लॉकडाऊनच्या काळातही महिलांना मंगळसूत्रे सावकारांकडे गहाण ठेवावी लागली. बेरोजगारीच्या संघर्षात अनेक माता, बहिणी, पत्नींना मंगळसूत्राचाच सौदा करावा लागला. महागाईचा सामना करताना मेटाकुटीस आलेल्या अनेक महिलांची मंगळसूत्रे रोजच पेढ्यांवर विकली जात आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसूत्रे खर्ची पडत आहेत. आई-बापांच्या, मुलांच्या इलाजासाठी रोज हजारो मंगळसूत्रे खर्ची पडत आहेत. मणिपुरात महिलांची नग्न धिंड काढून त्यांची मंगळसूत्रे खेचण्यात आली, तेव्हा मोदी काय करत होते? मोदी यांच्या काळातच कश्मीरात पुलवामा आणि इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये जवानांच्या असंख्य वीरपत्नींनी आपल्या मंगळसूत्रांचे बलिदान केले, हे मोदींना माहीत नसावे? कश्मिरी पंडितांची घर वापसी झालेली नाही आणि त्यातील अनेक महिलांनी मोदी काळातच मंगळसूत्रे गमावली आहेत. देशासाठी मंगळसूत्रांचा त्याग करण्याची महान परंपरा या देशात आहे. अशा मंगळसूत्रांचा राजकीय कारणांसाठी वापर करणाऱ्या नेत्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : हा तर उफराटा न्याय; उद्धव गटाची निवडणूक आयोगावर टीका

हे पराभूत मानसिकतेचे लक्षण

देशासाठी कोणताही संघर्ष आणि त्याग न करणाऱ्यांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. महाराष्ट्रात भाजपने काही ‘मंगळसूत्र चोर’ गँगच्या म्होरक्यांना प्रतिष्ठा देऊन आमदार वगैरे केले. या गँगने सांगली, कोल्हापुरात अनेक हिंदू महिलांची मंगळसूत्रे दिवसाढवळ्या उडवल्याची नोंद आहे. उत्तर प्रदेशात पाच वर्षांत मंगळसूत्र चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत, तेथे ‘योगीराज’ सुरू आहे. ‘‘काँग्रेसची मानसिकता शहरी नक्षलवाद्यांची असून माता-भगिनींनो, ते तुमची मंगळसूत्रेही सोडणार नाहीत,’’ असे मोदी यांनी सांगितले ते ऐन निवडणुकीत शांतता भंग करण्यासाठीच. मतदारांची दिशाभूल करून मते मागण्याची वेळ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांवर आली हेच त्यांच्या पराभूत मानसिकतेचे लक्षण आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक क्रांतिकारकांच्या पत्नींनी मंगळसूत्रांचे बलिदान केले नसते तर मोदी आज पंतप्रधान झालेच नसते. हे बहुसंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिक काँग्रेस विचारांचे होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांनी मंगळसूत्रांचे दान केले आहे आणि त्या महायज्ञात मोदीकृत भाजपची कोणतीच समिधा पडलेली नाही. मोदी आणि त्यांचे लोक हे सत्तेवर बसलेले आयतोबा आहेत. म्हणून त्यांनी पवित्र मंगळसूत्राची उठाठेव करण्याचा प्रयत्न केला. भारतमातेच्या गळ्यातही क्रांतिकारकांच्या बलिदानाचे, त्यागाचे मंगळसूत्र आहे. त्या मंगळसूत्रातील एकही मणी मोदीकृत भाजपचा नाही. मोदी यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पवित्र मंगळसूत्रावर चिखलफेक करून हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्माचा अपमान केला. त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, अशा शब्दात उद्धव गटाने अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. (Lok Sabha Election 2024 : Shivsena – UBT slams PM Modi and BJP statement on mangalsutra and congress menifesto)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 27, 2024 5:39 PM
Exit mobile version