ब्रिटेनमध्ये उष्णतेची लाट; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

ब्रिटेनमध्ये उष्णतेची लाट; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

ब्रिटेनमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. सध्या ब्रिटेनच्या नागरिकांना अभूतपूर्व उष्म्याचा सामना करावा लागत आहे. राजधानी लंडनसह मध्य, उत्तर आणि ईशान्य इंग्लंडच्या भागांत तीव्र उष्णतेमुळे ब्रिटनच्या हवामान विभागाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. (Britain smashes all-time heat record as temperatures breach 40 degrees C)

ब्रिटनमध्ये तापमानाने प्रथमच 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. मंगळवारी दक्षिण पश्चिम लंडनमध्ये तापमान 40.2 अंशावर पोहोचले होते. त्यानंतर या उष्णतेचा त्रास दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये 39 अंशांवर पोहोचला. ब्रिटनमध्ये सध्याचे तापमान पाहता ते 104.4 °F पर्यंत पोहोचले, यामुळे 2019 मधील 101.6°F चा पूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे.

ब्रिटनच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. लंडनमध्ये रात्रीचे तापमानही 26 अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. सध्यस्थितीत कडक उन्हामुळे हवामान खात्याला अनेक भागांसाठी रेड अलर्टचा इशारा दिला आहे.

सध्या उत्तर आणि दक्षिण लंडनच्या अनेक भागात रेड अलर्ट सुरू असून, उष्णतेमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ब्रिटनमध्ये वाढत्या उष्णतेमुळे वाहतूक सुविधाही कोलमडली आहे. वाहतूक सचिव ग्रँट शॅप्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनची रेल्वे ही उष्णता सहन करण्याइतकी प्रगत नाही. तसेच, अशा उष्णतेला तोंड देण्यासाठी रेल्वेला स्वतःचे अधिक आधुनिकीकरण करावे लागेल आणि त्यासाठी बरीच वर्षे जावी लागतील.

40 अंश सेल्सिअस तापमानामुळे ट्रॅकचे तापमानही 50, 60 किंवा 70 पर्यंत वाढते यावर परिवहन सचिवांनी भर दिला आहे. अशा परिस्थितीत रेल्वेचे डबे रुळावरून घसरण्याचा धोका जास्त आहे.

रेल्वेशिवाय या उष्णतेचा परिणाम विमानतळावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. उष्णतेमुळे ल्युटन विमानतळाच्या धावपट्टीवर परिणाम झाला. त्याचप्रमाणे रॉयल एअर फोर्सलाही धावपट्टीवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक शाळा बंद करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.


हेही वाचा – कर्नाटकात टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

First Published on: July 21, 2022 11:04 AM
Exit mobile version