लग्न करा ‘सायलेंट’ मोडमध्ये

लग्न करा ‘सायलेंट’ मोडमध्ये

प्रातिनिधीक फोटो

लग्नसोहळा म्हटंल का फटाक्यांची आतषबाजी ही होतेच. मात्र आता जर तुम्ही लग्नसोहळ्यात फटाके वाजवाल तर थेट तुमची रवानगी तुरुंगात केली जाणार आहे. ज्या व्यक्तीच्या लग्नात फटाके फोडले जाणार त्या नवरदेवाला आणि त्यांच्या वडिलांना १५ दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात येणार आहे. तसेच लग्नसोहळ्यात ज्या व्यक्ती फटाके फोडणार त्यांचा व्हिडिओ करुन पोलिसांच्या संकेतस्थळावर पोस्ट करावा असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. हा नियम वाचून दचकलात ना. मात्र हा नियम सध्या आपल्याकडे लागू झाला नसून उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर जिल्ह्यासाठी लागू करण्यात आला आहे.

येथे आहे लग्नसोहळ्यात फटाके वाजवण्यास बंदी

उत्तर प्रदेशमधील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात लग्नसोहळ्यात फटाके वाजवण्यास बंदी करण्यात आली आहे. गौतम बुद्धनगरचे जिल्हाधिकारी बीएन सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अंमलात आणण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आता लग्नसोहळ्यात जर फटाके वाजवण्यात आले तर त्यांची रवानगी तुरुंगात केली जाणार आहे. तर त्या नवरदेवाला आणि नवरदेवाच्या वडिलांना देखील तुरुंगवास होणार आहे. तसेच लग्नसोहळ्यातील आतषबाजीचा व्हिडिओ पोलिसांना पाठवणाऱ्याचे नावही गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

१० नंतर मोठ्यांनी गाणी वाजवण्यास बंदी

लग्नसोहळच्या दरम्यान रात्री गाणी वाजवण्यास परवानगी आहे. मात्र १० वाजण्याच्यानंतर मोठ्याने गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र असे घडल्यास गाणी वाजवणाऱ्यांसह नवरा, नववधू आणि त्यांच्या वडिलांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे.

यामुळे घेण्यात आला हा निर्णय

फटाक्यातून निघणारा विषारी वायू आरोग्यास अपायकारक असून प्रखर उजेड आणि मोठ्या आवाजामुळे नुकसान होते. तसेच फटाके वाजवल्यामुळे प्रदूषण देखील होते. यामुळे मोठ्या आवाजावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानेही निर्देश दिले आहेत. पण सर्व नियमांची पायमल्ली होत असल्याने सिंह यांनी गौतम बुद्धनगर जिल्ह्यात हे नियम लागू करण्यात आले आहेत.

First Published on: January 2, 2019 3:43 PM
Exit mobile version