कॅनडात भारतीयांविरोधातील द्वेषपूर्ण घटनांमध्ये वाढ; परराष्ट्र मंत्रालयाकडून अॅडव्हायजरी जारी

कॅनडात भारतीयांविरोधातील द्वेषपूर्ण घटनांमध्ये वाढ; परराष्ट्र मंत्रालयाकडून अॅडव्हायजरी जारी

कॅनडामध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि हिंसाचारात मोठी वाढ झाली आहे. यात अलीकडेच एका भारतीय विद्यार्थ्याला गोळ्या घालून ठार केल्याची घटना समोर आली होती. दरम्यान कॅनडामधील भारतीयांविरोधातील वाढत्या घटना पाहता भारत सरकारने एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. तसेच कॅनडाला जाणाऱ्या भारती. विद्यार्थ्यांना सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

कॅनडात भारतविरोधी कारवायांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने जारी केलेल्या अॅडव्हायजरीमध्ये सांगण्यात आले आहे की, कॅनडामध्ये द्वेषपूर्ण गुन्हे, सांप्रदायिक हिंसाचार आणि भारतविरोधी कारवायांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अशा स्थितीत कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनी या संदर्भात कॅनडा सरकारशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत घडलेल्या गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्यांना कॅनडामध्ये कोणतीही शिक्षा झालेली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

त्यामुळे वरील घटना लक्षात घेता भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांनी कॅनडामध्ये प्रवास करताना आणि अभ्यास करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन अॅडव्हायजरीमध्ये करण्यात आले आहे. तसेच भारत सरकारने भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना ओटावा किंवा टोरंटो आणि व्हँकुव्हर येथील भारतीय मिशनमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय नागरिकांना madad.gov.in वर नोंदणी करण्यास सांगितले आहे. यामुळे भारतीय उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना कॅनडातील भारतीय नागरिकांशी संपर्कात राहणे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे होईल.

काही दिवसांपूर्वी कॅनडातील खलिस्तानी अतिरेक्यांनी टोरंटो येथील एका प्रमुख हिंदू मंदिरावर भारतविरोधी भित्तिचित्रे तयार करून विद्रुपीकरण केल्याचे प्रकरण समोर आले होते . या घटनेला द्वेषपूर्ण गुन्हा ठरवत भारताने कॅनडाच्या अधिकाऱ्यांना आरोपींविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले. टोरंटोच्या BAPS स्वामीनारायण मंदिरात ही घटना कधी घडली, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण टोरंटोमधील भारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी ट्विट केले की, “आम्ही टोरंटोमधील BAPS स्वामीनारायण मंदिराच्या भारतविरोधी भित्तिचित्रांसह केलेल्या अपमानाचा तीव्र निषेध करतो. कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करून आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान कॅनडातील ओंटारियो येथे झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा शनिवारी मृत्यू झाला. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी दोन जणांना जीव गमवावा लागला. गेल्या सोमवारी गोळीबार झाला. यामध्ये एक भारतीय विद्यार्थी जखमी झाला आहे. सतविंदर सिंग असे त्याचे नाव आहे. हॅमिल्टन शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.


‘त्याला’ 12 वर्षांनंतर धक्क्यांवर धक्के; पत्नीचे खरे नाव समजले अन् धर्मांतरासाठीही धमक्या


First Published on: September 23, 2022 3:22 PM
Exit mobile version