उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गावर कारचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

उत्तरकाशीतील यमुनोत्री महामार्गावर कारचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ब्रह्मखल परिसरात ही घटना घडली आहे. भरधावात असलेल्या कारवरून वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली. यामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि सर्व स्थानिक रहिवाशांचा समावेश आहे.

उत्तराखंडमधील २४ तासांतील हा दुसरा मोठा रस्ता अपघात आहे. सहा महिन्यांतील ही चौथी घटना आहे. या घटनांमध्ये ७७ जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार उत्तरकाशीहून बडकोटच्या दिशेने जात होती. यादरम्यान यमुनोत्री महामार्गावरील ब्रह्मखलजवळ कारचे नियंत्रण सुटले आणि ही कार ५०० ​​मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात एक महिला प्रवासी गंभीर जखमी असून तिच्यावर उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही कार भरधाव वेगात असल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. ज्या ठिकाणी ही घटना घडली. त्या ठिकाणी रस्ता रुंद होता आणि आलवेदार अंतर्गत बांधकाम करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

चमोली जिल्ह्यातील जोशीमठ ब्लॉकमध्ये काल (शुक्रवार) भीषण अपघात झाला होता. टाटा सुमो गाडीवरील ताबा सुटून ती दरीत कोसळली होती. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. तर दोन जणांनी गाडीमधून उडी मारून जीव वाचवला होता.


हेही वाचा : किशोरी पेडणेकरांशी संबंधित ‘त्या’ चार सदनिका ताब्यात घ्या; एसआरएचे महापालिकेला आदेश


 

First Published on: November 19, 2022 2:31 PM
Exit mobile version