सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा नेत्रावती नदीत सापडला मृतदेह

सीसीडीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा नेत्रावती नदीत सापडला मृतदेह

प्रसिद्ध कॅफे चेन CCD (कॅफे कॉफी डे) चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले होते. आज त्यांचा ३६ तासानंतर नेत्रावती नदीत मृतदेह आढळून आला आहे. सिद्धार्थ सोमवारी कारने सक्लेश्पूर प्रवास करत होते. परंतु, अचानक त्यांनी आपल्या ड्रायव्हरला मंगळुरूकडे वळण्याचे सांगितले आणि तेथील नेत्रावती नदीच्या परिसरात गेले. त्यानंतर ते पुन्हा परतलेच नाही. त्यानंतर सर्व स्तरातून ते बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आणि आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी तपास पथकांनी सर्व प्रयत्न सुरू केले होते. आज, त्यांचा मंगळुरूतल्या नेत्रावती नदीत ३६ तासानंतर मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, व्ही. जी. सिद्धार्थ यांनी २७ जुलै रोजी त्यांच्या सहीनिशी लिहिलेलं एक पत्र समोर आल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालं आहे. या पत्रामध्ये व्यवसायामध्ये आलेलं अपयश आणि आर्थिक समस्येमुळे सिद्धार्थ यांना आलेलं नैराश्य स्पष्टपणे जाणवत असून त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचं गंभीर पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

या पत्रात सिद्धार्थ म्हणतात…

गेल्या ३७ वर्षांपासून मी हा व्यवसाय वाढवला. पण पूर्ण प्रयत्न करून देखील फायदेशीर ठरेल असं बिझनेस मॉडेल मी तयार करू शकलो नाही. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या लोकांचा मी अपेक्षाभंग केला आहे. मी खूप काळ संघर्ष केला. पण आज मी हरलो. एका खासगी गुंतवणूकदारानं व्यवसायातले त्याने खरेदी केलेले भाग (शेअर्स) मला पुन्हा खरेदी करायला भाग पाडले. तो ताण आता मी सहन करू शकत नाही. त्यासाठी मला एका मित्राकडून मोठी रक्कम उसनी घ्यावी लागली. इतर गुंतवणूकदारांकडून देखील आलेल्या प्रचंड दबावापुढे मी अखेर हरलो आहे. याआधीच्या आयकर विभागाच्या संचालकांनी देखील मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आला. कॉफी डेचे शेअर देखील त्यांनी घेऊन टाकले. आम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरूनही कारवाई करण्यात आली. हे अन्यायकारक होतं. त्यामुळे मोठी आर्थिक टंचाई निर्माण झाली. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही खंबीर राहा आणि नव्या मॅनेजमेंटसोबत हा व्यवसाय पुढे चालवा. माझ्या सर्व चुकांसाठी मी एकटाच जबाबदार आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहार ही माझी जबाबदारी आहे. माझी टीम, ऑडिटर्स, वरीष्ठ व्यवस्थापक यांना या व्यवहारांबद्दल काहीही माहिती नाही. यासाठी फक्त मलाच शिक्षा व्हावी. माझ्या कुटुंबियांना देखील याबद्दल काहीही माहिती नाही. मला कुणाला फसवायचं नव्हतं. पण मी अपयशी ठरलो हे मी या पत्राद्वारे कबूल करतो. मला आशा आहे की कधीतरी तुम्ही हे समजून घ्याल आणि मला माफ कराल.


हेही वाचा – सीसीडीचे मालक सिद्धार्थ बेपत्ता


 

First Published on: July 31, 2019 7:35 AM
Exit mobile version