पाकिस्तानची शेपूट वाकडीच; गोळीबारात जवान शहीद

पाकिस्तानची शेपूट वाकडीच; गोळीबारात जवान शहीद

संग्रहित छायाचित्र ( फोटो सौजन्य - PTI )

पाकिस्तानची शेपूट वाकडीच राहणार याची प्रचिती पुन्हा एकदा आली. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात एक जवान शहिद झाला आहे. काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सैन्यानं सकाळी कुपवाडातील माच्छिल सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय जवानांनी जशास तसे प्रत्युत्तर देखील दिले. पण, यावेळी एका जवानाला आपला जीव गमवावा लागला आहे. शहीद जवानंचं नाव अद्याप देखील कळू शकलेलं नाही. लष्कराचे श्रीनगरमधील प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. तणाव असल्यानं नियंत्रण रेषेजवळच्या भागांमधून चालणारा व्यापार बंद करण्यात आला आहे. सध्या पाकिस्तानकडून दिवसेंदिवस शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असून भारत देखील त्याला चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

वाचा – दहशतवादाच्या मुद्यावर भारत पाकला मदत करेल – राजनाथ सिंह

खरंच पाकला भारताशी संबंध सुधरवण्यामध्ये रस?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्नान खान यांनी आत्तापर्यंत अनेक वेळा पाकिस्तानला भारताशी  संबंध सदृढ ठेवायचे आहेत अशी बतावणी केली आहे. पण, प्रत्यक्षात कृती मात्र काहीच नाही. दिवसेंदिवस पाक सैनिक शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहेत. शिवाय, पाक पुरस्कृत दहशतवाद देखील वाढत आहे. यावर्षी शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा हा भारतीय लष्करानं केलेला आहे. पाकच्या वाढत्या कुरापती पाहता भारतानं देखील चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी होऊ शकत नाही अशी तंबी पाकिस्तानला दिली आहे. पण, त्यानंतर देखील पाकिस्तानकडून भारताच्या कुरापती काढणं सुरूच आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील दहशतवाद संपवण्यासाठी भारत पाकिस्तानला मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. पण, पाकिस्तान मात्र आपल्या कृत्यापासून मागे यायला तयार नाही.

वाचा – पाकिस्तानमधील सार्क परिषदेला मोदी जाणार नाहीत – स्वराज

First Published on: December 6, 2018 6:47 PM
Exit mobile version