केंद्राकडून ज्येष्ठ नागरिकांना नववर्षाचे गिफ्ट, अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवले

केंद्राकडून ज्येष्ठ नागरिकांना नववर्षाचे गिफ्ट, अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवत ज्येष्ठ नागरिकांना नव्या वर्षाचे गिफ्ट दिले आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जारी केल्यानुसार किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस ठेव योजना, राष्ट्रीय बचत पत्र आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या योजनांच्या व्याजदरांत वाढ करण्यात आली आहे.

अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.

त्यानुसार जानेवारी ते एप्रिल या तिमाहीसाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर 7.60 टक्क्यांवरून 8 टक्के, पोस्ट ऑफिस ठेव योजनेतील व्याजदर 6.70 टक्क्यांवरून 7.10 टक्के, किसान विकास पत्रावरील व्याजदर 7.0 टक्क्यांवरून 7.2 टक्के आणि राष्ट्रीय बचत पत्रावरील व्याजदर 6.80 टक्क्यांवरून 7.0 टक्के करण्यात आले आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पीपीएफवर 7.1 टक्के, सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के आणि पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटवर 5.80 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.

पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याजदरात कोणताही बदल नाही
पोस्ट ऑफिस बचत खात्यांवर उपलब्ध व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे खातेदारांना केवळ 4% वार्षिक दराने व्याज मिळेल. 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेव योजनांच्या व्याजदरात 1.10% वाढ झाली आहे. खरेतर भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर सर्व सरकारी बचत योजनांवरील व्याजदरात वाढ अपेक्षित होती. मात्र, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनांच्या खातेदारांची निराशा झाली आहे. सध्या PPF वर सध्याचा व्याजदर 7.1 टक्के आहे. आता अनेक बँका पीपीएफच्या तुलनेत मुदत ठेव योजनांवर जास्त व्याज देत आहेत.

सप्टेंबर 2018 मध्ये PPF वर 7.4% व्याजदर होता. जून 2019 मध्ये ते 8% पर्यंत वाढले, परंतु त्यानंतर घसरण सुरू झाली आणि आता व्याजदर 7.1% आहे. केंद्र सरकार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजदरात तिमाही आधारावर सुधारणा करते आणि या अंतर्गत 8 लहान बचत योजनांचे व्याजदर बदलले गेले आहेत.


हेही वाचाः २०२४मध्ये राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचं मोठं वक्तव्य

First Published on: December 30, 2022 10:24 PM
Exit mobile version