ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवरील सीमा शुल्कात सूट; पंतप्रधानांच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवरील सीमा शुल्कात सूट; पंतप्रधानांच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवरील सीमा शुल्कात सूट, पंतप्रधानांच्या उच्चस्तरीय बैठकीतला निर्णय

ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवरील सीमा शुल्कात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ही सूट असणार आहे. भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी संबंधित उपकरणांच्या पुरवठ्यात वाढ करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती. ऑक्सिजन आणि ऑक्सिजनशी संबंधित उपकरणांवरील सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.

ऑक्सिजनशी संबंधित उपकरणांमध्ये जनरेटर्स, स्टोअरेज टॅंक आदीचा समावेश असणार आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनच्या बऱ्याच अडचणी येत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा वाढण्याबरोबरच रूग्णालय व रूग्णालयात रूग्णांच्या काळजीसाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांची तातडीने गरज आहे, यावर आजच्या बैठकीत जोर देण्यात आला. ऑक्सिजन व वैद्यकीय पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी समन्वयाने काम करण्यावर भर द्या, अशी सूचना या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व मंत्रालये व विभागांना केली. या व्यतिरिक्त ऑक्सिजन व उपचार साधनांचा त्वरित कस्टम क्लिअरन्स करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी बैठकीत दिले.

कोरोना काळात लसींच्या आयातीवरील मूळ सीमा शुल्क तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी लागू असेल, असे या बैठकीनंतर केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यासाठी गेल्या काही दिवसांत बरीच पावले उचलली गेल्याचेही केंद्र सरकारने सांगितले.

First Published on: April 24, 2021 5:29 PM
Exit mobile version