Corona In India: महाराष्ट्रासह आठ राज्यांना सतर्क राहण्याचा केंद्राचा इशारा; नव्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला

Corona In India: महाराष्ट्रासह आठ राज्यांना सतर्क राहण्याचा केंद्राचा इशारा; नव्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला

देशात एकाबाजूला ओमिक्रॉनचे सावट पसरले आहे, तर दुसऱ्या बाजूला पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या आता लाखो पार गेली आहे. त्यामुळे कोरोनाच्या आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा पत्र लिहून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी केंद्राने चाचणी वाढवण्याचा सल्ला दिला असून अनेक सूचना दिल्या आहेत. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी संशयित रुग्ण आणि त्याच्या संपर्कात आलेल्यांची लवकरात लवकर तपासणी करणे हा प्रमुख उपाय असल्याचे या पत्रातून सांगितले आहे.

देशात ओमिक्रॉनने एंट्री घेतल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सातत्याने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सतर्क केले जात आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने होणारी वाढ या अनुषंगाने केंद्राने ठिकठिकाणी २४ तास कोरोना चाचणीकरता बूथ उभारण्याचा सल्ला राज्यांना दिला असून या बूथवर २४ अँटीजन चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आठ राज्यांना पत्र लिहून सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड या आठ राज्यांचा समावेश आहे. या आठ राज्यांना कोरोना चाचणी, लसीकरण याचे प्रमाण वाढवण्यास सांगितले आहे. तसेच रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करावी आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवावी, असे देखील आठ राज्यांना केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान मृत्यूदरात वाढ होऊ नये याकरिता राज्यांना कठोर पाऊल उचलण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे दिल्लीत लागू करण्यात आलेला जीआरएपी मॉडेल संपूर्ण देशात लागू करण्याचा विचार केला जात आहे. केंद्राच्या या पत्रातून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च (आयसीएमआर) चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, ताप, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, शारिरीक वेदना, चव किंवा वास न येणे, थकवा आणि जुलबा अशी लक्षणे दिसली तर त्यांना कोरोना संशयित रुग्ण मानले पाहिजे. या व्यक्तींची तपासणी करून अहवाल येईपर्यंत ताबडतोब स्वतःला वेगळे करावे आणि केंद्राच्या होम आयसोलेशनशी संबंधित मार्गदर्शन तत्वांचे पालन करावे.


हेही वाचा – २०२२ मध्ये संपणार कोरोना महामारी, WHO प्रमुखांचा मोठा दावा


 

First Published on: January 1, 2022 3:00 PM
Exit mobile version