देशाचा गौरव : जी-20चे अध्यक्षपद आजपासून भारताकडे, वर्षभरात 55 ठिकाणी 200 बैठका

देशाचा गौरव : जी-20चे अध्यक्षपद आजपासून भारताकडे, वर्षभरात 55 ठिकाणी 200 बैठका

नवी दिल्ली : भारत आजपासून एका वर्षासाठी जगातील आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांचा समूह असलेल्या जी-20च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहे. जी-20 हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचे प्रमुख व्यासपीठ आहे, जे जागतिक जीडीपीच्या 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगातील दोन तृतीयांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते.

जी-20च्या अध्यक्षपदाच्या काळात, देशातील 55 ठिकाणी, 32 वेगवेगळ्या क्षेत्रांशी संबंधित सुमारे 200 बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. तर, पुढील वर्षी होणारी जी-20 शिखर परिषद ही भारताने यजमान म्हणून आयोजित केलेल्या सर्वोच्च स्तरीय बैठकींपैकी एक असेल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जी-20ची पहिली बैठक उदयपूरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबरच्या सुरुवातीला भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20चा लोगो, थीम आणि वेबसाइट लाँच केली होती. त्याच्या लोगोमधील कमळाचे फूल हे भारताच्या प्राचीन वारसा, श्रद्धा आणि विचारसरणीचे प्रतीक आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांसह केंद्र सरकारद्वारे संरक्षित केलेल्या शंभर स्मारकांवर रोषणाई करण्यात येणार आहे. या स्मारकांमध्ये दिल्लीतील हुमायूंचा मकबरा आणि जुना किल्ला, गुजरातमधील मोढेरा सूर्य मंदिर, ओडिशातील सूर्य मंदिर, बिहारमधील शेरशाहचा मकबरा आणि राजगीरमधील नालंदा विद्यापीठाचे अवशेष आणि प्राचीन वास्तू तसेच इतर स्मारके, बंगालची राजधानी कोलकाता येथील मेटकाफ हॉल आणि मुद्रा भवन, गोव्यातील बॅसिलिका ऑफ बाम जीझस आणि चर्च ऑफ लेडी ऑफ रोझरी, कर्नाटकातील टिपू सुलतानचा पॅलेस आणि गोल घुमट तसेच मध्य प्रदेशातील सांची बौद्ध स्मारके आणि ग्वाल्हेर किल्ला यांचा त्यात समावेश आहे. या स्मारकांवर जी-20 लोगोही ठळकपणे लावला जाईल. भारतात युनेस्कोच्या 40 जागतिक वारसा स्थळे आहेत आणि बहुतेक सांस्कृतिक स्थळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत येतात.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपदही भारताकडे
भारत गुरुवारपासून एका महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (यूएनएससी) अध्यक्षपद भूषवत आहे. 15 सदस्यीय परिषदेचा निर्वाचित सदस्य म्हणून भारत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत दुसऱ्यांदा अध्यक्षपद भूषवित आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताने हे पद भूषविले होते. यूएनएससीमधील भारताचा कार्यकाळ 31 डिसेंबर रोजी संपणार आहे.

First Published on: December 1, 2022 8:58 AM
Exit mobile version