पत्नीला पोटगीमध्ये हजारोंची ‘चिल्लर’

पत्नीला पोटगीमध्ये हजारोंची ‘चिल्लर’

पती आणि पत्नी घटस्फोट घेणार असतील तर सहसा पत्नीला तिच्या उदरनिर्वाहासाठी पतीकडून पैसै दिले जातात. पत्नीची आर्थिक परिस्थीती पाहून मगच तिला हा उदरनिर्वाहाचा भत्ता किंवा पोटगी दिला जातो. मात्र, अशाप्रकरणात बहुतांशीवेळा पतीकडून टाळाटाळ केली जाते किंवा मुद्दाम विलंब केला जातो. काहीसा असाच प्रकार चंदीगढच्या एका स्थानिक न्यायालयात घडला. मंगळवारी संबंधित न्यायालयाच्या सुनवाईनुसार, पतीने आपल्या पूर्व पत्नीला पोटगी म्हणून २४ हजार रुपये दिले. मात्र, महाशयांनी ही संपूर्ण रक्कम चक्क १ आणि २ रुपयांच्या नाण्यांमध्ये दिली. ही नाणी इतकी जास्त होती की ती मोजण्यामध्ये संपूर्ण दिवस निघून गेला आणि अखेर न्यायालयाचं कामकाज स्थगित करावं लागलं.

पत्नीची नाराजी

ज्या व्यक्तीने नाण्यांच्या स्वरुपात पोटगी दिली तो स्वत: पंजाब- हरियाणा हायकोर्टामध्ये वकील आहे. आपल्या पत्नीला पोटगी देण्यासाठी हा इसम हजारो रुपयांची नाणी घेऊन आला होता. तब्बल २४ हजार ६०० रुपयांची रक्कम या व्यक्तीने नाण्यांच्या रुपात एका पोत्यामध्ये भरुन आणली होती. याप्रकरणी पत्नीने नाराजी व्यक्त करत हा प्रकार मुद्दाम आपल्याला छळण्यासाठी करण्यात आला असल्याचं ती म्हणाली. दरम्यान या जोडप्याने २०१५ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

वकील पतीची हुशारी

याप्रकरणी पत्नीने नाण्यांच्या स्वरुपातील रक्कम घेण्यास नकार दिला. इतकी नाणी बँकेत जमा करणं कठीण असून, बँकही त्यासाठी नकार देईल असं म्हणत पत्नीने नोटांची मागणी केली. मात्र, स्वत: वकील असलेल्या पतीने यावर काहीसं हुशारीने उत्तर दिलं. ‘नाणी जमा करुन घेतली जाणार नाहीत, असा कुठल्याही बँकेचा लेखी नियम नसल्यामनुळे बँक ही रक्कम जमा करुन घेईल’, असं पतीने आपल्या पूर्व पत्नीला सांगितलं. दरम्यान याप्रकरणातील पुढील सुनावणी २७ जुलै रोजी करण्यात येणार आहे.

First Published on: July 25, 2018 4:00 PM
Exit mobile version