Video: भारताला इस्रोच्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे – मोदी

Video: भारताला इस्रोच्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांची पाठ थोपटली

चांद्रयान २ मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पार पडत असताना शनिवारी रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला. चांद्रयान मोहिमेचे यश अवघ्या २.१ मिनिटांवर आले असताना अचानक लँडरशी संपर्क तुटल्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांसहीत संबंध देशभरात एक निराशेची लाट पसरली होती. मात्र या परिस्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांचे मनोबल उंचावण्याचे काम केले. “आयुष्यात चढ-उतार येत असतात. अपयश आले असले तरी ही छोटी उपलब्धी नाही” या शब्दात वैज्ञानिकांना धीर देत असताना मोदींनी त्यांची पाठ थोपटली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आम्हाला इस्रोच्या वैज्ञानिकांचा गर्व आहे. मी सर्व वैज्ञानिकांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी देश, विज्ञान आणि मानवजातीसाठी मोठी सेवा केली आहे. मी तुमच्या सोबत असून तुम्ही अधिक धैर्याने पुढे जावे.” चांद्रयान २ चे विक्रम लँडर उतरण्याचा क्षण पाहण्यासाठी मोदी स्वतः शुक्रवारी रात्री येलहांका एअरबेसवर पोहोचले होते.

इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी विक्रम लँडरचा ऑर्बिर्टरसोबतचा संपर्क तुटला असल्याची माहिती दिली. शेवटची १५ मिनिटे बाकी असताना लँडरचा संपर्क तुटला. त्यानंतर मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावले. चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याचा क्षण पाहण्यासाठी देशभरातून विद्यार्थी बंगळुरु येथे आले होते. या विद्यार्थ्यांशी देखील मोदींनी बातचीत केली.

 

 

First Published on: September 7, 2019 7:34 AM
Exit mobile version