मोदींना दिलेल्या क्लीन चीटवरुन निवडणूक आयोगात गोंधळ

मोदींना दिलेल्या क्लीन चीटवरुन निवडणूक आयोगात गोंधळ

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांकडून आयोजित केलेल्या प्रचारसभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले गेले. दरम्यान, विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप केला. यासंदर्भात विरोधी पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे मोदी आणि अमित शहांच्या विरोधात कारवाई करण्याची देखील मागणी केली. विरोधी पक्षांनी भाजप आणि मोदींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मात्र, विरोधकांच्या या तक्रारींवर भारतीय निवडणूक आयोगाने मोदी आणि अमित शहा यांना क्लीन चीट दिली. याच क्लीन चीटच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगात गोंधळ सुरु असल्याची बाब समोर आली आहे. अखेर निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील आरोरा यांनी पुढे येऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या क्लीन चीटवर निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील आरोरा यांना पत्र पाठवले. या पत्रामध्ये त्यांनी क्लीन चीट देण्याबाबत आयोगातील आयुक्तांमध्ये असलेली मतभिन्नतेची नोंद व्हावी, अशी मागणी केली. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासारखी निर्णय प्रक्रिया व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या निर्णय प्रक्रियेमुळे अल्पमत देखील नमूद होतील, असा मुद्दा त्यांनी पत्रात मांडला. लवासा यांनी पाठवलेल्या पत्रानंतर निवडणूक आयोगात गोंधळ सुरु असल्याची चर्चा रंगली. ती ऐवढी रंगली की अखेर निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

काय म्हणाले मुख्य निवडणूक आयोग?

या संदर्भात निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील आरोरा यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, ‘निवडणूक आयोगात तीन आयुक्त असतात. ते परस्परांशी क्लोन नसतात. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे एकमेकांचे विचार नाही जुळू शकत. असे होऊ शकते आणि ते योग्यच आहे.’ यापुढे ते म्हणाले की, ‘आपली सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची तयारी आहे. परंतु, प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ असते.’

कॉंग्रेसची निवडणूक आयोगावर टीका

दरम्यान, काँग्रेसने याच मुद्यावरुन निवडणूक आयोगावर टीका केली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे की, ‘अशोक लवासा यांच्या पत्रावरुन हे सिद्ध होते की निवडणूक आयोग मोदींच्या हातातील खेळणे झाले आहे.’

First Published on: May 18, 2019 4:35 PM
Exit mobile version