सरन्यायाधीश उदय लळित यांचे उत्तराधिकारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड! केंद्राकडे शिफारस

सरन्यायाधीश उदय लळित यांचे उत्तराधिकारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड! केंद्राकडे शिफारस

नवी दिल्ली : सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. येत्या 8 नोव्हेंबरला उदय लळित निवृत्त होणार असल्याने 7 ऑक्टोबरला केंद्र सरकारने पत्र पाठवून सरन्यायाधीश उदय लळित यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सुचवण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे हे सर्वोच्च पद लागोपाठ दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती भूषविणार आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट 2022 रोजी पूर्ण झाल्यावर न्यायमूर्ती लळित यांची 27 ऑगस्ट रोजी देशाचे 49वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. उदय लळित यांचा सरन्यायाधीश म्हणून एकूण 74 दिवसांचा कार्यकाळ आहे. ते आता महिन्याभरात निवृत्त होणार असल्याने नवीन सरन्यायाधीशांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने उदय लळित यांना पत्र लिहिले होते. त्यानुसार सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे.

सरन्यायाधीश पदासाठी सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची निवड केली जाते. सध्या न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सर्वात ज्येष्ठ आहेत, त्यामुळे पुढील सरन्यायाधीश ते होऊ शकतात. विद्यमान सरन्यायाधीश हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाच्या नावाची आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस करतो, अशी परंपरा आहे. विद्यमान नियमानुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाचे 50वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 असा दोन वर्षांचा असेल. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील जस्टीस यशवंत विष्णू चंद्रचूड हे 1978 ते 1985 या कालावधित ते भारताचे 16वे सरन्यायाधीश होते.

First Published on: October 11, 2022 12:05 PM
Exit mobile version