चीनच्या वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची एंट्री; ३ एप्रिलनंतर आढळले नवे रुग्ण

चीनच्या वुहानमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची एंट्री; ३ एप्रिलनंतर आढळले नवे रुग्ण

वुहानमध्ये पुन्हा एकदा आढळले कोरोना बाधित रुग्ण

चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली होती. इथूनच हा व्हायरस जगभरात पोहोचला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या आसपास चीनने या महामारीवर नियंत्रण मिळवले होते. ३ एप्रिल नंतर आता पहिल्यांदा वुहानमध्ये १४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य परिषदेने दिली आहे.

हे १४ नवे रुग्ण आढळण्याच्या एक दिवस आधी एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येने उसळी घेतली. चीनने मागच्या गुरुवारीच देशातील सर्व विभाग हे कमी धोक्याचे असल्याचे जाहीर केले होते. आता सध्या चीनच्या जिलिन प्रांतातील शुलान शहरात कोरोना रुग्णांचे क्लस्टर आढळले आहे.

जिलिन प्रांतातील प्रशासनाने आता शुलान शहराला अतिधोकादायक श्रेणीत टाकले आहे. ७ मे रोजी शुलान शहरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर रविवारी या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या परिवारातील ११ लोकांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. ३ एप्रिलनंतर पहिल्यांदाच वुहान प्रातांत पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत.

चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८२ हजार ९०१ असून त्यापैकी ४,६३३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

First Published on: May 10, 2020 5:44 PM
Exit mobile version