वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याच्या विधानानं चीनला राग अनावर; म्हणाले…LAC

वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याच्या विधानानं चीनला राग अनावर; म्हणाले…LAC

नवी दिल्लीः प्रत्यक्ष नियंत्रण रेषे (LAC)च्या स्थितीवरून अमेरिकेनं पुन्हा एकदा चीनचे कान टोचण्याचा प्रयत्न केलाय, त्याला चीननेही प्रत्युत्तर दिलं आहे. भारतासोबतच्या सीमेवरील घडामोडीबाबत अमेरिकेचे अधिकारी डोनाल्ड डू यांचे आरोप फेटाळून लावत चीनने स्पष्ट शब्दात अमेरिकेबाबत नाराजी व्यक्त केलीय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा हा भारत आणि चीनमधील मुद्दा असून, त्यात तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. चीनचा त्याला विरोध आहे. खरं तर डोनाल्ड लू यांनी त्यांच्या भारत भेटीदरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या कारभारावर ताशेरे ओढले होते.

डोनाल्ड लू यांच्या वक्तव्यावर चीन संतप्त झाला आणि द्विपक्षीय प्रकरणांमध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचं चीननं ठणकावून सांगितलं. सीमेवर परिस्थिती स्थिर असतानाही अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने भारत आणि चीनमधील संबंध बिघडवायचे प्रयत्न केल्याचा आरोपही चीनने केला आहे. सीमेवरील घडामोडीबाबत दोन्ही बाजू राजनैतिक आणि लष्करी माध्यमांच्या मदतीने वाटाघाटी करत असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीन अमेरिकेवर भडकला

भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील दक्षिण आणि मध्य आशियाई प्रकरणांचे सहाय्यक सचिव डोनाल्ड डू यांच्यावर निशाणा साधला. डोनाल्ड यांनी चीनबाबत केलेल्या टिप्पणीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. चीनच्या प्रवक्त्याने सांगितले की, भारत-चीन सीमेवर परिस्थिती नियंत्रणात आहे. अमेरिकन अधिकारी कोणतेही ठोस पुरावे नसताना चीनवर आरोप करीत आहेत. हा द्विपक्षीय मुद्दा असून त्यात तिसऱ्या देशांच्या हस्तक्षेपाला चीनचा विरोध आहे. भारत आणि चीनने सीमा समस्या सोडवण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी माध्यमांचा वापर केला आहे आणि चर्चा सुरू आहे. एलएसीवरील घडामोडीनंतर दोन्ही बाजूंनी परिस्थिती सामान्य करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. हा मुद्दा दोन देशांमधील आहे, तो संवाद आणि सल्लामसलत करून सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही चिनी प्रवक्त्याने सांगितले.

चीनकडूनच सीमेवर आक्रमक वृत्ती

अमेरिकन अधिकारी डोनाल्ड लू यांनी एका टीव्ही चॅनेलशी संवाद साधताना सांगितले की, अमेरिकेला वाटते की चीनने सीमेवरील वाद सोडवण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. उलट चीनकडून सीमेवर आक्रमक वृत्ती अवलंबली जात आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सामान्य करण्यासाठी चिनी लष्कराने कोणतीही ठोस पावले उचलल्याचे आम्हाला एकदाही पाहायला मिळाले नाही.


हेही वाचाः जुन्या पेन्शन योजनेवरून फडणवीसांची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, लाज वाटत…

First Published on: January 16, 2023 10:02 AM
Exit mobile version