चीनमध्ये लॉकडाऊन विरोधी आंदोलन झालं थंड

चीनमध्ये लॉकडाऊन विरोधी आंदोलन झालं थंड

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. परंतु, या लॉकडाऊनला चीनच्या जनतेने विरोध करत आंदोलन केले होते. त्यामुळे आता चीन सरकारने लॉकडाऊनचे नियम काहीसे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या कोरोनामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तसेच, पोलिसांनी आंदोलनाविरोधात जोरदार कारवाई सुरु केल्याने आज आंदोलनाचा जोरही ओसरल्याचे समजते. (China Zero Covid Citizen Agitation Lockdown Rules Police Action)

चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने धोका अधिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत कठोरपणे नियमांची अंमलबजावणी सुरु केली होती. मात्र या नियमांमुळे नागरिक हैराण झाल्याने त्यांनी या धोरणांविरोधात आंदोलन सुरु केले. गेल्या तीन दिवसांत आंदोलनाचे लोण देशभर पसरले असून नागरिकांनी उघडपणे सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढल्याने सरकारने एक पाऊल मागे घेत काही नियम शिथिल केले आहेत. काही शहरांमध्ये आंदोलन सुरु राहिले असले तरी त्याचा जोर आज कमी झाल्याचे दिसले. हाँगकाँगमध्ये सुमारे ५० विद्यार्थ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. इमारतीमधील आगीच्या दुर्घटनेनंतर आंदोलनाची ठिणगी पडल्याचे लक्षात घेऊन बीजिंगमधील प्रशासनाने रुग्ण आढळला तरी तो राहत असलेल्या इमारतीचे प्रवेशद्वार बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, गुआंगझोऊ येथे सर्वांनाच चाचणी करणे बंधनकारक नाही.

आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा असल्याने सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने त्यांच्याविरोधात कडक धोरण अवलंबले आहे. संसर्गग्रस्तांची संख्या वाढल्याचे कारण सांगत येथील विद्यापीठे विद्यार्थ्यांना घरी पाठवत आहेत. वर्ग आणि परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील, असे सांगत विद्यार्थ्यांना बसमधून रेल्वेस्थानकांवर सोडण्यात येत आहे.


हेही वाचा – टोयोटा किर्लोस्कर मोटरचे व्हीसी विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

First Published on: November 30, 2022 8:28 AM
Exit mobile version