CoronaVirus: चीन काही सुधरेना; कुत्र्या-मांजराचं मांस पुन्हा विक्रीला!

CoronaVirus: चीन काही सुधरेना; कुत्र्या-मांजराचं मांस पुन्हा विक्रीला!

चीनमध्ये कोरोनाचा भीषण संहार झाल्यानंतर पुन्हा एकदा मांसविक्रीच्या बाजारपेठा सुरू. सौ - डेली मेल

आख्ख्या जगाला मृत्यूच्या खाईत लोटणाऱ्या कोरोनाची सुरुवात ज्या चीनी मांसविक्रीच्या बाजारपेठांमधून सुरू झाली असं म्हटलं जातं, त्या बाजारपेठा आता पुन्हा सुरू झाल्याचं वृत्त आहे. ब्रिटनच्या द डेली मेलने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. या बाजारपेठांमध्ये कुत्री, मांजर, ससे यांच्याप्रमाणेच वटवाघुळाचं मांस देखील विक्रीला ठेवल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आत्ता कुठे वुहान, हुनान आणि आसपासची कोरोनाच्या भक्ष्यस्थानी पडलेली शहरं आत्ता कुठे पूर्वपदावर येत आहेत. जग अजूनही कोरोनाच्या विळख्यात असून दररोज शेकडो माणसांना जीव गमवावा लागत आहे. मात्र, इतक्यात पुन्हा एकदा या मांसविक्रीच्या बाजारपेठा सुरू झाल्यामुळे कोरोनाचं भय चीनला उरलंच नाही का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

व्हायरसला हरवल्याचा उन्माद?

कोरोना व्हायरसला पराभूत केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी या मांस विक्रीला परवानगी देण्यात आल्याचं देखील या वृत्तामध्ये म्हटलं आहे. या बाजारपेठा सुरू होताच ग्राहकांनी इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकीकडे आख्खं जग हळूहळू लॉकडाऊनमध्ये जाऊ लागलं असतानाच दुसरीकडे चीनने पुन्हा कोरोनाला कारणीभूत ठरलेल्या मांसविक्री बाजारपेठा सुरू केल्याचं चित्र दिसत आहे. दक्षिण पश्चिम चीनमधल्या गुईलीन प्रांतातल्या बाजारपेठांमध्ये विशेष करून गर्दी दिसून आली.

अर्थव्यवस्थेसाठी बाजारपेठांना परवानगी

चीनमध्ये कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर आणि नव्या मृत्यूंची नोंद अल्प झाल्यानंतर चीनने निर्बंध उठवले असून देशाची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी बाजारपेठा पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चीनी बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाचा धोका सर्वाधिक असलेल्या मांसविक्री बाजारपेठांमुळे पुन्हा नव्या व्हायरसचा फैलाव होतो की काय? अशी शंका निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच उंदरापासून पसरणाऱ्या हंता व्हायरसमुळे चीनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता.


वाचा – कोरोनाच्या उद्रेकानंतर मानसिक आजार असलेल्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ
First Published on: March 31, 2020 10:49 AM
Exit mobile version